देशातील करोनाबाधित रुग्ण दिवसागणिक झपाट्यानं वाढत आहेत. भारतातील करोनाबाधित रुग्णांची संख्या सात लाखांच्या पुढे गेली आहे. तर एकूण बळींची संख्याही २० हजारांच्या पुढे गेली आहे. सर्वाधिक करोनाबाधित रुग्ण असलेल्या देशात भारत आता तिसऱ्या स्थानावर पोहचला आहे. देशात दररोज वाढत असलेल्या करोनाबाधित रुग्णांमुळे चिंतेचे वातावरण आहे.

आरोग्य मंत्रलायाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत २२ हजार २५२ नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील करोनाबाधित रुग्णांची संख्या सात लाख १९ हजार ६६५ इतकी झाली आहे. दोन लाख ५९ हजार ५५७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या २४ तासांत तब्बल ४६७ जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण करोनाबाधित रुग्णांच्या बळींची संख्या २० हजार १६० इतकी झाली आहे. समाधानकारक बाब म्हणजे, आतापर्यंत चार लाख ३९ हजार ९४८ जणांनी करोनावर मात केली आहे.

देशात पाच दिवसांमध्ये १ लाखांपेक्षा जास्त रुग्ण वाढले असून सलग चार दिवस प्रतिदिन २० हजारांहून अधिक रुग्णवाढ झाली आहे. करोनासाठी झालेल्या चाचण्यांमध्ये करोनाबाधित नमुन्यांचे राष्ट्रीय सरासरी प्रमाण ६.७३ टक्के आहे. दिल्लीमध्ये चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात आले आहे. पण, करोनाबाधित रुग्णांचे सरासरी प्रमाण कमी होऊ लागले असल्याचा दावा करण्यात आला आहे. दिल्लीत प्रतिदिन १८ हजार चाचण्या घेतल्या जात आहेत.