रशियामध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या बहुपक्षीय लष्करी कवायतींमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. सहभागी न होण्यासाठी कोविड-१९ चे कारण देण्यात आले असले तरी त्या कवायतींमध्ये चीन आणि पाकिस्तान सहभागी होणार असल्याने भारताने त्यामध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे, असे सूत्रांनी सांगितले.

रशियाच्या दक्षिणेकडील अस्त्रखान प्रदेशात १५ ते २६ सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या लष्करी कवायतींमध्ये सहभागी होणार असल्याचे भारताने गेल्या आठवडय़ात रशियाला कळविले होते. मात्र आता या कवायतींमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय भारताने घेतला आहे, असे सूत्रांनी सांगितले.

भारताने यापूर्वी सहभागी होण्याचा घेतलेला निर्णय का बदलला याबाबत अधिकृत कारण दिलेले नाही, मात्र कवायतींमध्ये चीन आणि पाकिस्तानही सहभागी होणार असल्याने भारताने निर्णय बदलला, असे याबाबतच्या घडामोडींशी संबंधित व्यक्तींनी सांगितले.

चीन, पाकिस्तान आणि शांघाय सहकार्य संघटनेतील (एससीओ) अनेक सदस्य देश या कवायतींमध्ये सहभागी होण्याची अपेक्षा आहे. संरक्षण क्षेत्रात रशिया हा भारताचा मोठा भागीदार देश आहे आणि दोन्ही देशांमधील सहकार्य अधिकाधिक दृढ झाले आहे.