भोपाळमध्ये तीन दिवसांची आंतरराष्ट्रीय हिंदी परिषद आयोजित करण्यात येणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी १० सप्टेंबर रोजी या परिषदेचे उद्घाटन करणार आहेत. जागतिक पातळीवर हिंदी भाषा लोकप्रिय करणे, हा या परिषदेचा उद्देश असून त्यामध्ये २७ देशांचे प्रतिनिधी आणि भारतातील विद्वान सहभागी होण्याची अपेक्षा आहे.
या परिषदेच्या समारोपप्रसंगी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि महानायक अमिताभ बच्चन यांची भाषणे होणार आहेत. परिषदेत हिंदी भाषेबद्दल एकूण २८ परिसंवाद आयोजित करण्यात येणार आहेत.
गुगल आणि आयफोन बनविणाऱ्या कंपन्या परिषदेतील प्रदर्शनास सहभागी होऊन हिंदी भाषा लोकप्रिय करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. मध्य प्रदेश सरकारच्या सहकार्याने परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने ही परिषद आयोजित केली असून ‘हिंदूी जगत : विस्तार एवम् संभवनाई’ अशी परिषदेची संकल्पना आहे. अमिताभ बच्चन चित्रपटांमधून हिंदी भाषेचा प्रचार करण्याची प्रेरणा आहेत त्यामुळे ते ‘आओ अच्छी हिंदी बोले’ या विषयावर भाषण करणार आहेत, असेही स्वराज म्हणाल्या.हिंदीला संयुक्त राष्ट्र संघात अधिकृत भाषा म्हणून मान्यता मिळण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे का, असे विचारले स्वराज म्हणाल्या की, अशी मान्यता मिळण्यासाठी सर्वसाधारण सभेत १२९ मतांची गरज असते,भारताला सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी सदस्यत्व मिळाले की हिंदी भाषेचा यादीत समावेश करणे सुलभ होईल.