ओटीटी प्लॅटफॉर्म्स काही वेळा अश्लील भाग प्रदर्शित करतात त्यामुळे अशा कार्यक्रमांच्या प्रदर्शनासाठी काहीतरी यंत्रणा असायला हवी, असे मत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी व्यक्त केले.

समाजमाध्यमांचे नियमन करण्यासाठी सरकारने अलीकडेच तयार केलेली मार्गदर्शक तत्त्वे शुक्रवारी आपल्यापुढे सादर करावीत, असे न्या. अशोक भूषण व न्या. आर.एस. रेड्डी यांच्या खंडपीठाने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना सांगितले. ‘तांडव’ या वेबसीरिजबाबत पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरच्या संबंधात अटकपूर्व जामीन नाकारण्याच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओच्या भारतातील प्रमुख अपर्णा पुरोहित यांनी आव्हान दिले असून, त्यावर सर्वोच्च न्यायालय या दिवशी (शुक्रवारी) सुनावणी करणार आहे.

‘ओटीटी फलाट अश्लील भागही प्रदर्शित करत आहेत. त्यामुळे या संबंधात संतुलन साधले जायला हवे’, असे खंडपीठ म्हणाले.

पुरोहित यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी आपल्या अशिलाविरुद्धचे हे प्रकरण ‘धक्कादायक’ असल्याचे सांगितले. ही महिला निर्माती किंवा अभिनेत्री नसून केवळ अ‍ॅमेझॉनची कर्मचारी आहे, पण तरीही या वेबसीरिजच्या संबंधात देशभरातील १० प्रकरणांमध्ये तिला आरोपी करण्यात आले आहे, असे ते म्हणाले.

बॉलीवूडमधील सैफ अली खान, डिंपल कपाडिया व मो. झीशान अय्युब अशा आघाडीच्या कलाकारांच्या भूमिका असलेली ९ भागांची राजकीय थरारपट मालिका गेल्या काही दिवसांपासून प्रदर्शित होऊ लागली आहे. यात उत्तर प्रदेश पोलीस व हिंदू देवता यांचे अयोग्य चित्रण, तसेच पंतप्रधानांची भूमिका करणाऱ्या पात्राचे प्रतिकूल चित्रण करण्यात आले असल्याचा आरोप पुरोहित यांच्यावर ठेवण्यात आला आहे.