लडाखमध्ये भारत-चीन सैन्य आमनेसामने आल्यानंतर लष्करी संघर्ष उफाळून आला होता. त्या संघर्षानंतर भारतानं राष्ट्रीय आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं धोकादायक असलेल्या चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाबद्दल ‘इंडिया टुडे ग्रुप’ आणि ‘कार्वी इनसाइट्स’ने केलेल्या ‘मूड ऑफ द नेशन २०२०’ (Mood of The Nation 2020) सर्वेक्षणात प्रश्न विचारण्यात आला होता. यावर भारतीयांनी आपली मतं व्यक्त केली.

भारतीय गुप्तचर यंत्रणांनी ५२ धोकादायक चिनी अ‍ॅप्ससंदर्भात केंद्र सरकारने या अ‍ॅप्सवर बंदी घालावी किंवा देशातील नागरिकांना ही ५२ चिनी अ‍ॅप्स वापरुन नये असा इशारा दिला होता. ५२ चिनी अ‍ॅप्स सुरक्षित नसून, या अ‍ॅप्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भारतीयांची माहिती दुसऱ्या देशांमध्ये पाठवली जात आहे, असा इशारा दिला होता. सुरक्षा यंत्रणांनी सरकारला पाठवलेल्या यादीमध्ये टिक-टॉकबरोबरच युसी ब्राऊझर, एक्झेण्डर, शेअरइट, क्लीन मास्टर यासारख्या अ‍ॅप्सचा समावेश होता. त्यानंतर केंद्र सरकारनं ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी घातली होती.

“चिनी अ‍ॅप व चिनी कंपन्यांना बंदी घालण्याचा निर्णय चीनच्या आक्रमक धोरणाविरोधात योग्य दृष्टीकोन आहे का?” असा प्रश्न या सर्वेक्षणात विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना ९१ टक्के भारतीयांनी हो असं उत्तर दिलं आहे. चिनी अॅपवर बंदी घालणं योग्य निर्णय आहे, असं भारतीयांनी म्हटलं. तर हा निर्णय चुकीचा असल्याचं ७ टक्के भारतीयांनी म्हटलं आहे. दोन टक्के भारतीयांनी यावर माहिती नाही असं उत्तर दिलं आहे.

हे सर्वेक्षण २१ डिसेंबर २०१९ ते ३१ डिसेंबर २०१९ दरम्यान करण्यात आलं. यामध्ये १९४ विधानसभा मतदारसंघ आणि ९७ लोकसभा मतदारसंघातील १२ हजार १४१ जणांना सहभागी करुन घेण्यात आलं होतं. यामध्ये शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागातील लोक सहभागी होते.