१४ जुलै रोजी फ्रान्सच्या नाइस या शहरात झालेल्या हल्ल्याची जबाबदारी इसिस या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. हा हल्ला दहशतवादी हल्लाच होता असे स्पष्ट करत या हल्ल्याची संपूर्ण जबाबदारी आपण स्वीकारत असल्याचे इसिसने ‘टेलिग्राम’द्वारे म्हटले. ‘ज्याने आपल्या ट्रकखाली फ्रान्सच्या अनेक नागरिकांना चिरडले तो इस्लामिक स्टेटचा लढवय्या सैनिक होता’ असेही इसिस समर्थक ‘अमन’ या वृत्तसंस्थेने ‘टेलिग्रामला’ सांगितले.

इस्लामिक स्टेटच्या विरोधात जी राष्ट्र आहेत त्यात फ्रान्सही आहे म्हणून फ्रान्सवर हा हल्ला केला गेला असल्याचे ही त्यांनी म्हटले आहे.

परंतु अद्यापही फ्रान्सकडून इसिसच्या या दाव्याला दुजोरा दिला गेला नाही. फ्रान्स पोलिस या ट्रक ड्रायव्हरचे इसिसशी खरेच संबध होते का याची कसून तपासणी करत आहेत.

या तरूणाचा इसिसशी संबध असल्याची कोणतीही माहिती फ्रान्सच्या गुप्तचर यंत्रणेकडे नाही. तरी या माथेफिरू ट्रक ड्रायव्हरवर काही गुन्हे दाखल होते.

३१ वर्षाच्या ट्युनेशिअन तरूणांने राष्ट्रीय दिन साजरा करण्यासाठी जमलेल्या नागरिकांवर ट्रक चालवला होता. यात जवळपास ८४ हून  अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी नंतर गोळ्या झाडून या माथेफिरू ट्रक ड्रायव्हरला ठार केले होते.

त्याच्या कुटुंबियांना देखील फ्रान्स पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.