नवी दिल्ली : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू सहा दिवसांच्या दौऱ्यासाठी भारतात दाखल झाले आहेत. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दिल्ली विमानतळावर ते पोहोचले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेतन्याहू यांची गळाभेट घेत त्यांचे स्वागत केले. त्यानंतर मोदी आणि नेतन्याहू विमानतळाहून तीन मूर्ती मार्गावरून पुढे रवाना झाले.

या दौऱ्यादरम्यान, दोन्ही देशांमध्ये संरक्षण, कृषी, पाणी संरक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच अंतराळ सुरक्षेसह अनेक आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर यावेळी सविस्तर चर्चा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात इस्रायलच्या पंतप्रधानांचा हा पहिलाच भारत दौरा आहे.

दुपारी २.३० मिनिटांनी नेतन्याहू ताज हॉटेलमध्ये परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. भारत आणि इस्रायल यांच्यातील राजनैतिक संबंधांना २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर नेतन्याहू भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. भारतातील आपल्या सहा दिवसांच्या दौऱ्यादरम्यान ते दिल्ली, आग्रा, अहमदाबाद आणि मुंबई या शहरांना भेटी देणार आहेत. त्यांच्याबरोबर एक कार्यकारी शिष्टमंडळही भारतात येत आहे.

नेतन्याहू यांचा कार्यक्रम :

दुपारी २.३० मिनिटांनी नेतन्याहू ताज हॉटेलमध्ये परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. भारतातील आपल्या सहा दिवसांच्या दौऱ्यादरम्यान ते दिल्ली, आग्रा, अहमदाबाद आणि मुंबई या शहरांना भेटी देणार आहेत.

१५ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेतन्याहू यांच्यात द्विपक्षीय चर्चा होईल. दुसऱ्या भारत-इस्रायल सीईओ फोरमच्या बैठकीत हे दोन्ही नेते सहभागी होणार आहेत. त्यानंतर नेतन्याहू राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतील.

१६ जानेवारी रोजी नेतन्याहू रायसिना संवादामध्येही भाग घेणार आहेत.

१७ जानेवारीला ते गुजरातमध्ये कृषी क्षेत्रातील राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्राला भेट देणार आहेत.

१८ जानेवारी रोजी नेतन्याहू हे मुंबईला जाणार आहेत. याठिकाणी ते व्यावसायिक चर्चा करणार आहेत. भारत दौऱ्यादरम्यान नेतन्याहू आग्रा येथील जगप्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू ताजमहलला भेट देणार आहेत.

१९ जानेवारी रोजी ते परतीच्या प्रवासात असतील.

१९९२ पासून भारत आणि इस्रायल या दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेल्या राजनैतिक संबंधांना यंदा २५ वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांचा भारत दौरा खूपच महत्वपूर्ण मानला जात आहे. यापूर्वी २००३मध्ये एनडीए सरकारच्या काळात इस्रायचे तत्कालिन पंतप्रधान एरियल शेरॉन भारत भेटीवर आले होते.