आसाममध्ये सोमवारपासून बेपत्ता झालेल्या भारतीय हवाई दलाच्या एएन-३२ या विमानाचा अनेक प्रयत्न करुनही अद्याप शोध लागलेला नाही. त्यामुळे आता उपग्रहांच्या मदतीने या विमानाचा शोध घेण्यात येणार आहे. त्यासाठी भारतीय सैन्य आणि उपग्रह यंत्रणा या विमानाच्या शोधासाठी तैनात करण्यात आली आहे.

https://twitter.com/ani_digital/status/1135861897033658368

हवाई दलाच्या एएन-३२ या विमानाने आसाममधील जोरहत येथून सोमवारी दुपारी उड्डाण केले त्यानंतर ते बेपत्ता झाले होते. यावेळी विमानात १३ जण होते. अरुणाचल प्रदेशातील चीन सीमेजवळील मेचुका व्हॅली येथील अॅडव्हान्स्ड लॅंडिग ग्राऊंड येथे पोहोचणे अपेक्षित होते, मात्र तत्पूर्वीच या विमानाचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. त्यानंतर हवाई दलाने आपली सुखोई एसयू-३० लढाऊ विमान, सी-१३० हरक्युलस ही विमाने शोधकार्यासाठी पाठवली. मात्र, अद्यापही बेपत्ता विमानाचा शोध लागू शकला नाही.

त्यामुळे आता भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनेही आपली RISAT मालिकेची रडार्स आणि हवाई दलाने आपली हेरगिरी करणारी विमाने या विमानाच्या शोधासाठी तैनात केली आहेत. मात्र, ईशान्येकडे असलेल्या ढगाळ वातावरणामुळे या शोधकार्यात अडथळे येत आहेत.

हवाई दलाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, विमानाचे उतरण्याचे ठिकाण असलेले मेचुका अॅडव्हान्स्ड लॅंडिग ग्राऊंड हे चीनच्या सीमेपासून सुमारे ३५ किमी अंतरावर आहे. सन २०१३ पासून बंद असलेल्या या विमानतळाचा गेल्या वर्षी पुन्हा वापर सुरु करण्यात आला. बेपत्ता झालेले हवाई दलाचे एएन-३२ हे विमान रशियन बनावटीचे असून हे ट्विन इंजिन टर्बोप्रॉप ट्रान्सपोर्ट विमान आहे.