भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) बुधवारी एकाचवेळी १०४ उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करत नवा इतिहास रचला. इस्रोच्या पीएसएलव्ही सी-३७ या महत्त्वकांक्षी मोहिमेकडे जगातील अनेक देशांचे लक्ष लागले होते. अखेर आपल्या लौकिकाला जागत इस्रोने न भूतो न भविष्यती अशी कामगिरी करून दाखविली. इस्रोच्या पोलार सॅटेलाईट लाँच व्हेईकल (पीएसएलव्ही) या स्वदेशी बनावटीच्या प्रक्षेपकाच्या सहाय्याने हे उपग्रह अवकाशात सोडण्यात आले. आंध्र प्रदेशच्या श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून पीएसएलव्ही-सी ३७ प्रक्षेपक सकाळी ९ वाजून २८ मिनिटांनी आकाशात झेपावला. उड्डाणापासून ते अंतराळाच्या कक्षेत उपग्रह वेगळे होण्यापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यात आखल्याप्रमाणे सर्वकाही व्यवस्थित पार पडले आणि इस्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. या यशस्वी कामगिरीने इस्रोने यापूर्वीचा स्वत:चा एकाचवेळी २० उपग्रह प्रक्षेपित करण्याचा विक्रम मोडीत काढला. विशेष म्हणजे अंतराळ संशोधन क्षेत्रातील दिग्गज समजल्या जाणाऱ्या अमेरिका आणि रशियालाही न जमलेली कामगिरी भारताने करून दाखविली आहे.

या अभूतपूर्व कामगिरीनंतर इस्रोवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून पीएसएलव्ही सी-३७ आणि कार्टोसॅट उप्रगहाच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल इस्रोच्या शास्त्रज्ञांचे कौतूक केले. इस्रोची ही उल्लेखनीय कामगिरी देशासाठी आणि भारताच्या अंतराळ शास्रत्रांसाठी अभिमानाचा क्षण असल्याचे मोदींनी सांगितले.

एकाचवेळी प्रक्षेपित करण्यात येणाऱ्या उपग्रहांच्या संख्येमुळे ‘पीएसएलव्ही सी ३७’चे उड्डाण ऐतिहासिक ठरले. एकाच उड्डाणातून अधिकाधिक उपग्रह वाहून नेल्यास प्रत्येक उपग्रहामागील उड्डाणाचा खर्च अत्यंत कमी होतो. एकाच उड्डाणातून इतक्या मोठ्या प्रमाणात विकसित देशांचे उपग्रह व्यावसायिक तत्त्वावर इस्रो प्रक्षेपित करत असल्यामुळे जगभरातील अवकाश कंपन्यांचे ‘पीएसएलव्ही’च्या उड्डाणाकडे विशेष लक्ष होते. अवकाश क्षेत्रातील महासत्ता मानल्या जाणाऱ्या अमेरिकेतील खासगी कंपन्या आपले उपग्रह नासा किंवा अमेरिकी कंपन्यांऐवजी ‘इस्रो’च्या माध्यमातून प्रक्षेपित करणे किफायतशीर समजत आहेत, यातच येत्या काळात भारतासाठी उपलब्ध होणाऱ्या व्यावसायिक संधीची झलक दिसून येते. त्यामुळे अवकाश संशोधनाच्या क्षेत्रामध्ये एका नव्या दरयुद्धाला सुरुवात होणे अपेक्षित आहे.

यापूर्वी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) एकाचवेळी २० उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केले होते. जानेवारी महिन्यात एकाचवेळी ८३ उपग्रह अंतराळात सोडण्याचा इरादा होता. मात्र, ही मोहीम पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर आता आणखी २० उपग्रहांची भर पडली असून आज पीएसएलव्ही सी-३७ एकाचवेळी १०४ उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केले. यापूर्वी एकाच उड्डाणातून अमेरिकेने सर्वाधिक २९, तर रशियाने ३७ उपग्रह अवकाशात पाठवले होते. मात्र, इस्रोने आज एकाचवेळी १०४ उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करत अंतराळ संशोधन क्षेत्र भारत कोणत्याही विकसित देशापेक्षा मागे नसल्याचे दाखवून दिले. पीएसएलव्ही सी-३७ च्या माध्यमातून प्रक्षेपित करण्यात आलेल्या १०४ उपग्रहांमध्ये १०१ विदेशी आणि तीन भारतीय उपग्रह होते. यामध्ये अमेरिका, जर्मनी, इस्त्रायल, कझाकिस्तान, नेदरलँड, स्वित्झर्लंड आणि फ्रान्स या सात देशांच्या उपग्रहांचा समावेश होता.

Live Updates
09:41 (IST) 15 Feb 2017
पीएसएलव्ही सी-३७ चे यशस्वी प्रक्षेपण; इस्त्रोची अभूतपूर्व कामगिरी
09:30 (IST) 15 Feb 2017
पीएसएलव्ही सी-३७ ची पहिल्या टप्प्यातील वाटचाल यशस्वी
09:29 (IST) 15 Feb 2017
पीएसएलव्ही सी-३७ चे आकाशात उड्डाण; थोड्याचवेळात अंतराळाच्या कक्षेत जाणार
09:26 (IST) 15 Feb 2017
आंध्र प्रदेशच्या श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून पीएसएलव्ही सी-३७ उड्डाण करणार
09:21 (IST) 15 Feb 2017
अवघ्या काही मिनिटांत पीएसएलव्ही सी-३७ अवकाशात झेपावणार
08:42 (IST) 15 Feb 2017
इस्त्रो एकाचवेळी १०४ उपग्रह अवकाशात सोडून इतिहास रचणार
08:39 (IST) 15 Feb 2017
पीएसएलव्ही सी-३७ सकाळी ९ वाजून २८ मिनिटांनी अवकाशात झेपावणार