11 December 2017

News Flash

काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्यांना व्हॉट्सअॅपवरून चिथावणी; NIA च्या चौकशीत खुलासा

ग्रुपचे अॅडमिन पाकिस्तानमध्ये

श्रीनगर | Updated: September 5, 2017 4:33 PM

ग्रुपमधील सुमारे ६, ३८६ मोबाईल नंबर 'एनआयए'च्या रडारवर होते

जम्मू-काश्मीरमधील दगडफेकीच्या घटनांची सहा महिने चौकशी केल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) धक्कादायक खुलासा केला आहे. दगडफेक करणाऱ्यांना व्हॉट्स अॅपवरुन चिथावणी दिली जात होती. यासाठी व्हॉट्स अॅपवर सुमारे ७९ ग्रुप तयार करण्यात आले होते आणि या ग्रुपचे अॅडमिन पाकिस्तानमध्ये होते अशी माहिती समोर आली आहे.

जम्मू- काश्मीरमधील हिंसाचार आणि दगडफेकीच्या घटनांचा ‘एनआयए’कडून तपास सुरु होता. ‘एनआयए’ने दगडफेकीच्या घटनांसाठी जबाबदार असलेल्या व्हॉट्स अॅप ग्रुपचा शोध घेतला आहे. व्हॉट्स अॅपवर ७९ ग्रुप तयार करण्यात आले होते. या ग्रुपमधील सुमारे ६, ३८६ मोबाईल नंबर ‘एनआयए’च्या रडारवर होते. यातील एक हजार मोबाईल नंबर हे पाकिस्तान आणि अरब देशांमधील होते. तर उर्वरित मोबाईल नंबर हे जम्मू-काश्मीरमधील आहेत. दगडफेक कधी करायची, कोणावर करायची अशा सूचना या ग्रुपच्या माध्यमातून दिल्या जात होत्या. यातील बहुसंख्य ग्रुपचे अॅडमिन हे पाकिस्तानचे असल्याचे उघड झाले आहे.

‘व्हॅली ऑफ टिअर्स’, ‘पुलवामा रिबेल्स’, ‘फ्रिडम फायटर्स’, ‘तहरिक- ए- आझादी’, ‘मुजाहिदीन-ए-इस्लाम’, ‘अल- जिहाद’ अशा विविध नावांनी व्हॉट्स अॅपवर ग्रुप सुरु करण्यात आले होते. ‘एनआयए’ने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन हा तपास केला आहे. दगडफेकीसाठी चिथावणी देणारे ११७ संशयित हे स्वतःदेखील दगडफेकीच्या घटनांमध्ये सामील होते. दगडफेक करणाऱ्यांना आर्थिक रसद कशी पुरवली गेली याचा खुलासाही एनआयएने केला आहे. याशिवाय संशयितांचे फोन नंबर, सोशल मीडियावरील अकाऊंट्स, घराचा पत्ता याची माहितीही एनआयएच्या तपासात समोर आली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून हिंसाचार सुरु होता. अथक प्रयत्नानंतर या हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात सुरक्षा दलांना यश आले होते.

First Published on September 5, 2017 4:33 pm

Web Title: jammu and kashmir 79 whatsapp groups allegedly used to spread message stone pelters admins abroad nia