जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील(जेएनयू) कथित देशविरोधी घोषणांप्रकरणी विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार याला विद्यापीठाकडून दहा हजारांचा दंड आकारण्यात आला आहे, तर त्याचा सहकारी उमर खालीद याला एका शैक्षणिक सत्रासाठी विद्यापीठातून निलंबीत करण्यात आले आहे. याशिवाय, शिस्तभंग केल्याप्रकरणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सौरभ शर्मा यालाही १० हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

‘जेएनयू’ विद्यार्थी संघटनेच्या अनिर्बान भट्टाचार्य याच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. अनिर्बान याला १५ जुलैपर्यंत विद्यापीठातून निलंबीत करण्यात आले आहे. ‘जेएनयू’च्या विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष आशुतोष कुमार याला २० हजारांचा दंड आणि एक वर्षासाठी वसतीगृहातून काढून टाकण्यात आले आहे.

‘जेएनयू’मध्ये ९ फेब्रुवारी रोजी दहशतवादी अफझल गुरूच्या समर्थनार्थ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात भारताविरोधात घोषणाबाजी करण्यात आल्याचा आरोप कन्हैय्या आणि त्याच्या सहकाऱयांवर करण्यात आला होता. घोषणांचा व्हिडिओ देखील समोर आला होता. या प्रकरणी कन्हैया कुमार, उमर खालिद आणि इतर विद्यार्थ्यांना अटकही करण्यात आली होती. या सर्वांवर सध्या देशद्रोहाचा आरोप असून, ते जामीनावर बाहेर आहेत.