जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या प्राणघातक हल्ल्याचे देशभर पडसाद उमटत आहेत. विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ वेगवेगळ्या राज्यातील विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून निषेध नोंदवत आहेत. मुंबई, पुण्यातही हल्ल्याविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. रविवारी रात्री चेहरे झाकलेल्या लाठय़ा-काठय़ाधारी हल्लेखोरांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यात अनेक विद्यार्थ्यांसह प्राध्यापक जखमी झाले आहेत. विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयेषी घोषदेखील या हल्ल्यात गंभीर जखमी झाली. या प्रकरणी गृहमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

या हल्ल्यात विद्यार्थी आणि प्राध्यापकांसह किमान १८ जण जखमी झाले आहेत. त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्ल्यामागे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा (अभाविप) हात असल्याचा आरोप जेएनयू विद्यार्थी संघटनेने केला आहे. ‘अभाविप’ने मात्र त्याचा इन्कार केला आहे.

Live Blog

14:11 (IST)06 Jan 2020
हे उत्तम कायदा आणि सुव्यवस्थेचं लक्षण नाही - संजय राऊत

जेएनयूमधील हिंसाचारावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असून हे उत्तम कायदा आणि सुव्यवस्थेचं लक्षण नाही अशी टीका केली आहे. देशाच्या राजधानीत कधी पोलीस विद्यापीठात जाऊन गोळ्या चालवतात, तर कधी मुखवटा घातलेले हल्लेखोर विद्यापीठांमध्ये धुडगूस घालत हिंसाचार करतात हे योग्य नाही. देशातील विद्यार्थी सुरक्षित नसेल तर देश सुरक्षित राहणार नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

14:02 (IST)06 Jan 2020
‘मोदी आधुनिक हिटलर तर शाह तडीपार’; पुण्यात पोस्टरबाजी

दिल्लीमधील जेएनयूमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी पुण्यातील गरवारे कॉलेजबाहेर विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. पुण्यातील गरवारे कॉलेजबाहेर विद्यार्थी केलेल्या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. आंदोलक पंतप्रधान नरेंद्र मोदी आधुनिक हिटलर असल्याचे पोस्टर्सही आंदोलकांनी हाती घेतले होते. तसेच काही विद्यार्थ्यांनी शाह यांचा 'तडीपार' असा उल्लेख असलेले फोटो हाती पकडले होते. विशेष म्हणजे विद्यार्थीनीही या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

फोटो पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

13:59 (IST)06 Jan 2020
जितेंद्र आव्हाड यांनी विद्यार्थी आंदोलनात सहभागी होऊन केंद्र सरकारचा जाहीर निषेध केला
13:51 (IST)06 Jan 2020
जेएनयूमधील हिंसाचार पाहून २६/११ मुंबई हल्ल्याची आठवण झाली - उद्धव ठाकरे

जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) झालेला हिंसाचार पाहून मला २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याची आठवण झाली असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. तोंड झाकून हल्ला करणाऱ्यांचा खरा चेहरा समोर आला पाहिजे असं सांगताना हल्लेखोरांचा शोध घेऊन कारवाई करणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी गरज लागल्यास महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची सुरक्षा वाढवली जाईल असं आश्वासन दिलं. उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांचं नाव घेण्याचं टाळत आपल्याला राजकारण करायचं नसल्याचं सांगितलं आहे.

बातमी वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

12:56 (IST)06 Jan 2020
जेएनयूमधील हल्ला भ्याड आणि पूर्वनियोजित - शरद पवार

जेएनयूमधील विद्यार्थी आणि प्राध्यापकांवर करण्यात आलेला हल्ला भ्याड आणि पूर्वनियोजित आहे. मी या घटनेचा निषेध नोंदवतो. हिंसाचाराच्या सहाय्याने लोकशाही मूल्ये आणि विचारांना दडपण्याचा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही असं ट्विट शरद पवार यांनी केलं आहे.

12:49 (IST)06 Jan 2020
मुंबईतील भाजपाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन

मुंबईत भाजपा कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आलं. यावेळी पोलिसांनी कारवाई करत काही आंदोलकांना ताब्यात घेतलं.

12:34 (IST)06 Jan 2020
गेट-वेवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनात जिंतेद्र आव्हाड

जेएनयूमधील हिंसाचाराविरोधात मुंबईमधील गेट-वे ऑफ इंडियाजवळ विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु असून गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आंदोलनात सहभागी झाले आहेत. रात्रीपासून विद्यार्थी या ठिकाणी ठिय्या आंदोलन करत आहेत.

12:21 (IST)06 Jan 2020
काही हल्लेखोर विद्यार्थ्यांची ओळख पटली आहे, मात्र अद्याप अटक नाही - दिल्ली पोलीस

जेएनयू विद्यापीठात विद्यार्थी आणि प्राध्यापकांना मारहाण करणाऱ्या काही विद्यार्थ्यांची ओळख पटली असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. मात्र अद्याप याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

12:05 (IST)06 Jan 2020
जेएनयूमधील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न - जावडेकर

भाजपा नेते प्रकाश जावडेकर यांनी डावे, काँग्रेस आणि आम आदमी पक्ष जेएनयूमधील वातावरण बिघडवत असल्याचा आरोप केला आहे. गेल्या तीन दिवसांपासून हिवाळी सत्रातील नोंदणी प्रक्रिया थांबवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही प्रकाश जावडेकर यांनी केला आहे. विद्यार्थ्यांना नोंदणी करण्यासापासून का रोखलं जात आहे ? काही मिनिटांतच बाहेरील व्यक्ती आतमध्ये घुसतात हे कसं काय शक्य आहे ? योगेंद्र यादव, सिताराम येचुरी आणि इतर नेते जेएनयूमध्ये पोहोचले ? या सगळ्यावरुन घटनेमागची योजना लक्षात येते असं प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे.

11:43 (IST)06 Jan 2020
साबरमती हॉस्टेलच्या वॉर्डनचा राजीनामा

सुरक्षेचं कारण देत साबरमती हॉस्टेलच्या वरिष्ठ वॉर्डन इन-चार्जने राजीनामा दिला आहे.

11:39 (IST)06 Jan 2020
एबीव्हीपीचे विद्यार्थी १ वाजता पत्रकारांशी बोलणार

जखमी विद्यार्थ्यांना सोबत घेऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीव्हीपी) दुपारी एक वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. सत्य जाणून घेण्यासाठी सर्व प्रसारमाध्यमांनी हजर राहावं असं आवाहन त्यांच्याकडून कऱण्यात आलं आहे.

11:35 (IST)06 Jan 2020
पुण्यातील गरवारे कॉलेजबाहेर विद्यार्थ्यांचे आंदोलन

पुण्यातील गरवारे कॉलेजबाहेर विद्यार्थी आंदोलन करत असून जेएनयूमधील हिंसाचाराच्या घटनेचा निषेध नोंदवत आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आधुनिक हिटलर असल्याचे पोस्टर हातात घेतले आहेत.

11:31 (IST)06 Jan 2020
हल्लेखोरांविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे - पार्थ पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांनीदेखील जेएनयूमधील हिंसाचारावर मत नोंदवलं असून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पार्थ पवार यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, "जेएनयूमधील विद्यार्थी आणि प्राध्यापकांविरोधात करण्यात आलेल्या हिंसाचार चुकीचा असून निषेधार्ह आहे. हल्लेखोरांविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे".

11:19 (IST)06 Jan 2020
पोलीस विद्यार्थ्यांशी बातचीत करुन पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करत आहेत

जेएनयूचे कुलगुरु आणि रजिस्ट्रार यांनी दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांची भेट घेतली असून संपूर्ण घटनेची माहिती दिली. पोलीस विद्यार्थ्यांशी बातचीत करुन पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान एम्स आणि सफदरजंग रुग्णालयातील विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी पूर्ण झाली असून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

11:00 (IST)06 Jan 2020
विद्यार्थ्यांचा राजकारणासाठी वापर करणं योग्य नाही - स्मृती इराणी

तपास सुरु झाला असल्याने सध्या त्यावर बोलणं योग्य राहणार नाही. पण विद्यापीठ राजकारणाचे अड्डे होणं तसंच विद्यार्थ्यांचा राजकारणासाठी वापर करणं योग्य गोष्ट नाही असं केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे.

10:57 (IST)06 Jan 2020
जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

हिंसाचारात जखमी झालेल्या ३४ विद्यार्थ्यांना एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. या सर्व विद्यार्थ्यांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती एम्सचे ट्रॉमा सेंटरचे प्रमुख डॉ राजेश मल्होत्रा यांनी दिली आहे.

10:27 (IST)06 Jan 2020
दिल्ली पोलिसांकडून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल

जवाहरलाल नेहरु विद्यापीठ हिंसाचार प्रकरणी दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मालमत्तेचं नुकसान, हिंसाचार केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीसीपी देवेंद्र आर्या यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही घटनेची दखल घेतली आहे. सोशल मीडिया आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून आम्ही माहिती मिळवत आहोत. दरम्यान रुग्णालयात दाखल २३ विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.


10:20 (IST)06 Jan 2020
अमित शाह यांचा नायब राज्यपालांना फोन

अमित शाह यांनी दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्याशी बातचीत केली असून जेएनयूमधील प्रतिनिधींना बोलावून त्यांच्याशी चर्चा करण्यास सांगितलं असल्याची सुत्रांची माहिती आहे.

10:10 (IST)06 Jan 2020
गृहमंत्र्यांच्या समर्थनाविना हल्ला होणं शक्य आहे का ? सुरजेवाला यांचा सवाल

काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी ट्विटरच्या माध्यमातून जेएनयू हिंसाचारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. गृहमंत्र्यांच्या समर्थनाविना हल्ला होणं शक्य आहे का ? असा सवाल त्यांनी विचारला आहे.
१) जेएनयू कॅम्पसमध्ये झालेला हल्ला पूर्वनियोजित होता
२) या हल्ल्याला जेएनयू प्रशासनाचं समर्थन होतं
३) हे भाजपाचे गुंड होते
४) विद्यार्थी/प्राध्यापकांना मारहाण होत असताना पोलीस मात्र मूकदर्शक होऊन पाहत होते
हे सगळं गृहमंत्र्यांच्या समर्थनाविना शक्य आहे का ?

09:53 (IST)06 Jan 2020
त्या गुंडांवर तातडीने कारवाई व्हावी - आदित्य ठाकरे

निषेध करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेला हल्ला चिंताजनक आहे. जामिया असो किंवा जेएनयू…विद्यार्थ्यांवर क्रूर बळाचा वापर केला जाऊ नये… त्या गुंडांवर तातडीने कारवाई व्हायला पाहिजे असं ट्विट आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. 

09:51 (IST)06 Jan 2020
मोदी - शाह यांचे गुंड विद्यार्थ्यांमध्ये भीती निर्माण करत आहेत - प्रियंका गांधी

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी विद्यार्थ्यांना करण्यात आलेल्या माराहाणीचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत संताप व्यक्त केला आहे. एम्समध्ये भर्ती करण्यात आलेल्या काही विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही गुंड कॅम्पसमध्ये घुसले आणि काठी तसंच इतर गोष्टींनी मारहाण करण्यास सुरुवात केली. अनेकजण जखमी झाले अशून काहींची हाडं मोडली आहेत. एका विद्यार्थ्याने पोलिसांनी डोक्यात लाथा घातल्याचं सांगितलं आहे अशी माहिती प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटमधून दिली आहे.

JNU Violence: पोलिसांनी विद्यार्थ्यांच्या डोक्यात लाथा घातल्या – प्रियंका गांधी

09:46 (IST)06 Jan 2020
लवकरच एफआयआर दाखल करु - दिल्ली पोलीस

आम्हाला वेगवेगळ्या तक्रारी प्राप्त झाल्या असून लवकरच एफआयआर दाखल करु अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.

09:41 (IST)06 Jan 2020
गेट वे ऑफ इंडियाला विद्यार्थ्यांचं आंदोलन
09:40 (IST)06 Jan 2020
पोलिसांना कारवाईच्या सूचना

हल्ल्याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही दिल्ली पोलिसांकडे तातडीने अहवाल मागवला असून वरिष्ठ पोलिसांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. गृहमंत्री शहा यांनी दिल्लीच्या पोलीस आयुक्तांशी चर्चा केली असून त्यांना आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे ट्विट गृहमंत्रालयाने केले आहे.

09:39 (IST)06 Jan 2020
मुंबईत आज निदर्शने

जेएनयूवरील हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईतील विविध संघटना निदर्शने करण्यासाठी रस्त्यावर उतरल्या असून आज दिवसभर आंदोलन करणार आहेत. गेट वे ऑफ इंडियावर रात्री विद्यार्थ्यांकडून कँडल मार्च काढत ठिय्या आंदोलन करण्यात आल्या. हुतात्मा चौक येथे सायंकाळी ४ वाजता छात्र भारती, जॅक मुंबई आणि सर्व पुरोगामी संघटना आंदोलन करणार आहेत.

09:35 (IST)06 Jan 2020
मनुष्यबळ विकास मंत्रालयाने तातडीने अहवाल मागवला

मनुष्यबळ विकास मंत्रालयाने जेएनयूच्या निबंधकांकडे हल्ल्याबाबतचा अहवाल तातडीने मागितला आहे. या हल्ल्याचा अहवाल युद्धपातळीवर मागवला असून विद्यापीठ परिसरात शांतता राखण्यासंदर्भात कुलगुरू आणि दिल्ली पोलिसांशी चर्चा केल्याचे मनुष्यबळ विकास मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, या हिंसाचाराच्या निषेधार्थ देशातील विविध विद्यापीठांमध्ये आंदोलन सुरु झाले आहे.