ब्रिटनमध्ये वास्तव्यास असलेले अमेरिकन संशोधक जॉन ओ’कीफ आणि मूळचे नॉर्वेचे असलेले आणि गेली कित्येक वर्षे ब्रिटनमध्येच संशोधन कार्यात गढलेले एडवर्ड मूसर आणि त्यांची पत्नी मे-ब्रिट मूसर या तिघांना औषधशास्त्रातील अत्युच्च नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. आपल्या भोवतालच्या दृश्य परिघाचा नकाशा तयार करणाऱ्या मेंदूतील पेशी शोधून त्याद्वारे मेंदूचे आज्ञाकार्य कसे चालते आणि स्मृतीची साठवण कशी होते, याबाबत या तिघांनी मूलभूत संशोधन केले आहे. या संशोधनामुळे स्मृतीभ्रंशासारख्या रोगांवर नव्या उपचारांना वाव मिळाल्याचे पुरस्कार समितीने नमूद केले आहे. हा पुरस्कार १.१ दशलक्ष अमेरिकन डॉलरचा असून यातील निम्मी रक्कम प्रा. ओ’कीफ यांना तर उर्वरित अधी रक्कम मूसर दाम्पत्याला दिली जाणार आहे. हा समारंभ १० डिसेंबरला होणार आहे.