त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव देव यांच्यावर फेसबुकवर पोस्ट केल्यानं एका पत्रकाराला हल्ल्याला सामोर जावं लागलं.  बिप्लव देव यांच्यावर टीका करणारा व्हिडिओ फेसबुकवर टाकल्याने अज्ञातांनी पत्रकाराला मारहाण केल्याची घटना घडली आहे. जखमी पत्रकारावर रुग्णालयात उपचार सुरू असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

त्रिपुरामध्ये स्थानिक माध्यमांनी करोना काळात होणाऱ्या असुविधांच्या बातम्या प्रसारित केल्या होत्या. त्यावर नाराजी दर्शवत बिप्लव देव यांनी एका कार्यक्रमात माध्यमांना माफ करणार नाही, असं म्हटलं होतं. त्यानंतर एका पत्रकाराने त्यांच्यावर टीका केली होती. एनडीटिव्हीनं या संदर्भात वृत्त दिलं आहे.

त्रिपुरातील बंगाली वर्तमानपत्राचे पत्रकार पाराशर बिस्वास यांना करोनाची लागण झाली होती. कोविड केअर केंद्रातून बरं झाल्यानंतर त्यांनी व्हिडिओद्वारे मुख्यमंत्री बिप्लव देव यांच्यावर टीका केली होती. मी मुख्यमंत्र्याना आव्हान देतो की त्यांनी पत्रकारांना धमकावू नये. मी आज हा व्हिडिओ पोस्ट करत आहे. भविष्यातही करेन असे पाराशर बिस्वास यांनी म्हटलं होतं.

पाराशर यांच्या व्हिडीओवर अनेकांनी टीका केली होती. शनिवारी त्यांच्या घरात घुसत काही अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला चढवला व मारहाण केली. त्यानंतर जखमी झालेल्या पाराशर यांना आगरातळाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

भाजपा कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला असल्याचा संशय असल्याचा बंगाली दैनिकाचे संपादक सुबल डे यांनी सांगितले. तर त्रिपुराचे भाजपा प्रवक्ते नंबेदु भट्टाचार्य यांनी हे आरोप फेटाळून लावले. त्यांनी या घटनेचा निषेध केला असून पोलीस योग्य तपास करत आहेत, असं सांगितले.