फरार असलेला विकिलिक्सचा संस्थापक ज्युलियन असांजे याने आणखी गुप्त माहिती आपण येत्या काही दिवसात फोडणार असल्याचे सूतोवाच केले असून ही माहिती नेमकी कशाबाबत असेल हे मात्र त्याने सांगितले नाही.
असांजे हा लंडनमधील इक्वेडोरच्या दूतावासातून स्काइपवर बोलत होता. त्याने सांगितले की, अभ्यागत धोरणानुसार थोडी सूट असली तरी आपण जेथे राहत आहोत तो तुरूंगच असल्यासारखे आहे. असांजे याला जून २०१२ मध्ये लंडनमधील इक्वेडोरच्या दूतावासात ठेवण्यात आले असून त्याने काल टेक्सासमधील ऑस्टिन येथे आयोजित एका महोत्सवात उपस्थित असलेल्या ३५०० लोकांशी व्हिडीओ मुलाखतीद्वारे संपर्क साधला. त्यात त्याने सरकारी पाळत, पत्रकारिता व  युक्रेनमधील स्थिती यावर बरेच भाष्य केले. असांजे तासभर बोलला त्या वेळी काही तांत्रिक अडथळे आले.
 काहीवेळा त्याने लोकांना ऐकू येते की नाही असा प्रश्न विचारून हात वर करण्यास सांगितले. बारबारियन ग्रुपचे सहसंस्थापक बेंजामिन पामर यांनी असांजे याची मुलाखत घेतली. काही वेळा त्याला टेक्स्टींग करून प्रश्न विचारले.
 असांजे याने पांढरा शर्ट, स्कार्फ, काळा ब्लेझर घातला होता. त्याने ओबामा प्रशासनावर टीका करताना सांगितले की, एडवर्ड स्नोडेन याने नॅशनल सिक्युरिटी एजन्सी म्हणजे एनएसएबाबत जी माहिती फोडली ती अमेरिकी सरकारने गांभीर्याने घेतली नाही. जर सरकार गंभीर असते तर कुणाला तरी काढले असते, कुणाला तरी राजीनामा द्यावा लागला असता, खटला भरला गेला असता, तरतूद कमी केली असती, चौकशी केली असती पण तसे आठ महिन्यात काहीच घडलेले दिसत नाही. याच महोत्सवात स्नोडेनही रशियातून याच पद्धतीने बोलणार आहे.
 सध्या त्याने रशियात आश्रय घेतलेला आहे. आता इंटरनेट हा मानवी समुदायाचा भाग झाला आहे व इंटरनेट कायदे हे समाजाच्या कायद्याचा भाग बनले आहेत. एनएसएने इंटरनेटमध्ये जी घुसखोरी केली ते नागरी अवकाशातील लष्करी आक्रमणच आहे, असे असांजे याने सांगितले.