चांद्रयान २ मोहीमेअंतर्गत विक्रम लँडरला यशस्वीपणे चंद्राच्या भूपृष्ठावर उतरवण्यास अपयश आले. भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष के. सिवन यांनीच विक्रम लँडरशी संपर्क तुटला असून डेटा गोळा केला जात आहे, अशी माहिती दिली. त्यानंतर रविवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यासंदर्भात देशाला संबोधित केले. मोदींच्या या भाषणानंतर सिवन यांना भावना अनावर झाल्या आणि त्यांना रडू आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिवन यांना मिठी मारत धीर दिल्याचा प्रसंग सर्व देशवासियांनी पाहिला. यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी या प्रसंगावर आपल्या भावना व्यक्त केल्या. मात्र प्रसंगानंतर के. सिवन यांच्या नावाने असणाऱ्या ट्विटर अकाऊंटवरुन अनेक ट्विट करण्यात आले. तरी सोशल नेटवर्किंगवर असणारी के. सिवन यांची सर्व अकाऊंट खोटी असून कोणत्याही सोशल नेटवर्किंगवर साईटवर त्यांचे खासगी अकाऊंट नसल्याची माहिती इस्त्रोने दिली आहे. तसेच त्यांच्या नावाने चालवल्या जाणाऱ्या अकाऊंटवरुन खोटी माहिती पसरवली जात असून त्यावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन इस्त्रोने केले आहे.

इस्त्रोने ट्विटरच्या माध्यमातून हे स्पष्टीकरण दिले आहे. ‘डॉ. कैलासावडिवू सिवन यांच्या नावाने अनेक सोशल नेटवर्किंग साईट्सवर अकाऊंट असल्याचे दिसून आले आहे. मात्र इस्त्रोचे अध्यक्ष के. सिवान यांचे कोणतेही खासगी अकाऊंट नाही,’ असं ट्विट इस्त्रोने केलं आहे. या ट्विटबरोबर दिलेल्या लिंकमध्ये इस्त्रोच्या वेबसाईटवरील एका पेजची लिंक दिली असून त्यावर के. सिवान यांच्या नवाने असलेल्या अकाऊंटवरुन देण्यात येणारी माहिती खरी नसल्याचे म्हटले आहे.

तसेच इस्त्रोने दिलेल्या माहितीनुसार इस्त्रोची तीनच अधिकृत अकाऊंट आहेत. यामध्ये ट्विटर अकाऊंट, फेसबुक अकाऊंट आणि यु ट्यूब अकाऊंटचा समावेश आहे.

नक्की वाचा >>
के. सिवान: शेतकऱ्याचा मुलगा ते ‘चांद्रयान-२’चे नेतृत्व करणारे इस्रोचे अध्यक्ष

चांद्रयान २ मधील विक्रम लँडरशी संपर्क प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू असून आघाती अवतरणानंतर ते चंद्राच्या पृष्ठभूमीवर कोसळले असले तरी, त्याचे तुकडे झालेले नाहीत, ते सुस्थितीत आहे, असे भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) सोमवारी स्पष्ट केले. लँडरचे तुकडे झालेले नाहीत, तर ते सुस्थितीत आहे. ते थोडे कललेल्या अवस्थेत आहे, असे ‘इस्रो’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले. विक्रम लँडरशी पुन्हा संपर्क प्रस्थापित करण्याचे ‘इस्रो’चे प्रयत्न सुरू आहेत. त्यांना यश आले तर नेमके काय घडले हे समजू शकेल. इस्रो टेलिमेट्री, ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्क (इस्ट्रॅक)च्या टीमने या अवतरणात नेमके काय चुकले असावे याचा शोध सुरू केला आहे.

नक्की वाचा >>

“मिठी मारून रडणे एका वैज्ञानिक संस्थेच्या प्रमुखास शोभत नाही”

दरम्यान, एकीकडे संपूर्ण देश लँडरशी संपर्क होण्यासाठी प्रार्थना करत असतानाच हा संपर्क होणे अवघड असल्याचे बोलले जात आहे. चंद्रावर आधीच लँडरचे अवतरण झाले आहे. आता त्याला फिरवू शकत नाही. त्याचे अँटेना भूकेंद्राच्या दिशेने नाहीत किंवा ऑर्बिटरच्या दिशेलाही नाहीत, त्यामुळे त्याच्याशी संपर्क होणे कठीण आहे. पण अँटेना वळवता आले तर संपर्क शक्य आहे. लँडरवर सौर बॅटरी आहेत, त्या फारसा वापरल्या गेलेल्या नाहीत. त्यामुळे विजेचा प्रश्न नाही. तरीही हे सर्व अवघड आहे, असे सांगण्यात येत आहे.