‘भ्रष्ट’ सरकार चालवून मतदारांचा विश्वासघात करणारे माजी मुख्यमंत्री कमल नाथ आणि दिग्विजय सिंह हे मध्यप्रदेशातील ‘सगळ्यात मोठे गद्दार’ असल्याचा आरोप भाजपचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी सोमवारी केला. लोकांचे प्रश्न प्रत्येक व्यासपीठावर मांडूनही त्यांची सोडवणूक न करण्यात आल्यामुळेच आपल्याला काँग्रेस सोडावी लागली, असे त्यांनी सांगितले.

येत्या ३ नोव्हेंबरला राज्यात पोटनिवडणूक होत असलेल्या विधानसभेच्या २८ जागांपैकी सर्वच नसल्या, तरी बहुतांश जागा भाजप जिंकेल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. या २८ पैकी २७ जागा यापूर्वी काँग्रेसच्या ताब्यात होत्या. त्यामुळे भाजपकडे जिंकण्यासाठी सर्व काही आहे, तर काँग्रेसकडे सर्व हरण्यासाठीच आहे, असे पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत शिंदे म्हणाले.

लोकांना काँग्रेसपासून काहीही आशा नाही- तळागाळात तर नाहीच, पण या पक्षाच्या विद्यमान आमदारांपासूनही नाही. पक्षाचे आमदार इतक्या मोठय़ा संख्येत- जवळजवळ ३० टक्के – पक्ष सोडून जात असल्याचे तुम्ही इतर कुठल्या राज्यात पाहिले असेल असे मला वाटत नाही. काँग्रेस पक्षाच्या राज्यातील नेतृत्वावर, म्हणजे कमल नाथ व दिग्विजय सिंह यांच्यावर लोकांचा विश्वास नसल्याचे यातून स्पष्टपणे दिसून येते, असेही राज्यसभेचे खासदार असलेले शिंदे म्हणाले.