पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने काश्मीर प्रश्नावर टि्वट केल्यापासून भारताचे सर्वच आघाडीचे क्रिकेटपटू त्याच्यावर तुटून पडले आहे. गौतम गंभीरने चपराक लगावल्यानंतर कर्णधार विराट कोहली, कपिल देव, सुरेश रैना यांनीही आफ्रिदीला सुनावलं आहे.

शाहिद आफ्रिदीच्या विषयावर प्रश्न विचारल्यावर भारताचे माजी कर्णधार कपिल देव तर अक्षरक्ष: भडकलेच. आफ्रिदीला इतके का महत्व दिले जातेय ? त्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. तो कोण आहे ? त्याला आपण इतके महत्व का देतोय? काही लोकांना आपण उगाचच महत्व देऊ नये असे कपिल देव म्हणाले.

सुरेश रैनानेही टि्वट करुन काश्मीरच्या प्रश्नावर आपल्या भावना व्यक्त केल्या. काश्मीर भारताचा अविभाज्य भाग असून तो कायम भारताचाच भाग राहिल हे पाकिस्तानने ध्यानात घ्यावे असे टि्वट रैनाने केले आहे. शाहिद आफ्रिदीने पाकिस्तानी लष्कराला काश्मीरमध्ये दहशतवाद, छुपे युद्ध थांबवायला सांगावे. आम्हाला रक्तपात नको तर शांतता हवी आहे असे रैनाने टि्वटमध्ये म्हटले आहे.