दिल्ली जन मंडळाचे उपाध्यक्ष कपिल मिश्रा यांच्या नावाची दिल्लीचे नवे विधिमंत्री म्हणून घोषणा करण्यात आली आहे. बनावट पदवी बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आल्यानंतर विधिमंत्री जितेंद्रसिंह तोमर यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर मिश्रा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची आपण भेट घेतली तेव्हा त्यांनी आपण नवे विधिमंत्री असल्याचे स्पष्ट केले, असे मिश्रा यांनी सांगितले. विधिमंत्रिपदासाठी अलका लांबा, माजी विधिमंत्री सोमनाथ भारती आणि कैलास गेहलोत यांच्या नावांचाही विचार करण्यात आल्याचे सूत्रांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
विधानसभेच्या निवडणुकीत आपला भरघोस यश मिळाल्यानंतर मिश्रा यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार, अशी चर्चा होती, मात्र त्यांना दिल्ली जल मंडळाचे उपाध्यक्ष करण्यात आले होते. मिश्रा हे केजरीवाल यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात.
आपचे नेते योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांनी केजरीवाल यांच्याविरोधात बंड पुकारल्यानंतर मिश्रा यांनी केजरीवाल यांच्या समर्थनार्थ आमदारांची स्वाक्षरी मोहीम हाती घेतली होती. त्याला दिल्लीत संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले होते.