पाकिस्तानमधील कराची येथे बुधवारी करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यात ४७ जणांचा मृत्यू आणि अनेकजण जखमी झाले आहेत. तेहरिक-ए-तालिबान या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे.  यावेळी दहशतवाद्यांनी ईस्माईली समाजाच्या एका बसला लक्ष्य बनविले.  हल्ल्याच्यावेळी बसमध्ये ६० जण होते. प्रत्यक्षदर्शींनी ‘डॉन’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनूसार चार मोटारसायकल्सवरून आलेल्या या आठ जणांकडे मोठ्याप्रमाणावर शस्त्रसाठा होता. या सर्वांनी बसला घेरले आणि त्यानंतर बसवर अंदाधुंद गोळीबार केला. त्यामध्ये बसमधील अनेक प्रवाशी जखमी झाले. मात्र, पाकिस्तानातील काही पोलीस अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर धक्कादायक माहिती उघड केली आहे. त्यांच्या सांगण्यानूसार हे सर्व हल्लेखोर बसच्या आत शिरले आणि त्यांनी प्रवाशांच्या डोक्यामध्ये गोळ्या घातल्या. मात्र, या वृत्ताला अद्यापही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
दरम्यान, हल्ला झाले ते ठिकाण आडवाटेला असून रूग्णालयापासून तब्बल पाच किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे जखमींना रुग्णालयापर्यंत नेण्यात अनेक अडचणी येत आहेत. परंतु ईस्माईली समाजाची ही बस नेहमी याच मार्गाने जात असे. हीच गोष्ट हेरून दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची शक्यता आहे.