Kargil Vijay Diwas. प्रेम ही एक अशी भावना आहे जिच्याविषयी खरंतर कितीही लिहिलं, बोललं किंवा वाचलं तरी कमीच असतं. याच भावनेची एखाद्याच्या आयुष्यात जेव्हा चाहूल लागते तेव्हा सर्व गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलून जातो. सारं जग जिंकल्याची भावनाही अनेकांच्या मनात घर करते. अशा या प्रेमाविषयी बोलताना सहसा सलीम- अनारकली, रोमिओ- ज्युलिअट, हिर- रांझा अशा जोड्यांची नावं घेतली जातात. काल्पनिक पात्रांच्या सहाय्याने प्रेमकहाणीच्या जगात रमणाऱ्यांसाठी आणखी एका जोडीची प्रेमकहाणी तितकीच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाची आहे. ती प्रेमकहाणी आहे, एका सैनिकाची. १९९९ मध्ये कारगिल युद्धात शहिद झालेल्या भारतमातेच्या सुपुत्राची. ही प्रेमकहाणी आहे, शहिद कॅप्टन विक्रम बत्रा यांची.

युद्धभूमीवर आपल्या अद्वितीय कामगिरीने शत्रूला गारद करणाऱ्या विक्रम बत्रा यांच्या आयुष्यात प्रेमाचा बहर आला तो त्यांना पुरतं बदलून गेला. ‘क्विंट’ने साधारण दोन वर्षांपूर्वी बत्रा यांच्या प्रेयसीची मुलाखत प्रसिद्ध केली होती. ज्यामध्ये त्यांनी कॅप्टनसोबतचं सुरेख नातं आणि त्यांच्या आठवणींचा हळुवारपणे उलगडा केला होता.

डिंपल छीमा असं विक्रम बत्रा यांच्या प्रेयसीचं नाव. १९९५ मध्ये पंजाब विद्यापीठात त्यांची पहिल्यांदाच भेट झाली होती. एमए इंग्रजीच्या अभ्यासक्रमासाठी दोघांनीही प्रवेश घेतला होता. अर्थात या दोघांचंही शिक्षण पूर्ण झालं नाही. आमची भेट घडवून आणण्यासाठीचा तो सर्व नियतीचाच खेळ होता, असं डिंपल म्हणाल्या होत्या. विद्यापीठात प्रवेश मिळाल्यानंतर काही काळातच बत्रा यांना देहरादून येथे असणाऱ्या सैन्यदल प्रशिक्षण केंद्रात प्रवेश मिळाला होता. तेव्हापर्यंत डिंपल आणि त्यांच्यात प्रेमाचा बहर आलाच होता. हे दोघं एकमेकांपासून दूर असूनही त्यांच्या मनांमध्ये मात्र तसूभरही अंतर नव्हतं.

जाणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक दोघांच्याही कुटुंबियांकडून लग्नाची विचारणा होऊ लागली होती. मुळात आपण एकमेकांसाठीच या जगात आलो आहोत, हे विक्रम आणि डिंपल जाणून होते. मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे, एके दिवशी मनसा देवी आणि श्री नाडा साहेब गुरुद्वारा येथे भेट दिली असता परिक्रमा पूर्ण करुन झाल्यावर विक्रम डिंपल यांना उद्देशून म्हणाले होते, ‘तुमचं खुप खुप अभिनंदन मिसेस बत्रा’. त्याचवेळी डिंपल यांच्या लक्षात आलं की पूर्णवेळ विक्रम त्यांच्या ओढणीचं टोक पकडून होते.

कुटुंबियांकडून वारंवार होणाऱ्या लग्नाच्या विचारणेमुळे ज्यावेळी डिंपल प्रमाणाबाहेर अस्वस्थ झाल्या होत्या, तेव्हा विक्रम यांनी पाकिटातून ब्लेड काढत, अंगठा कापून डिंपल यांच्यासोबतच्या नात्यावर आपल्या रक्ताची निशाणी लावली होती. कुंकवाच्या जागी, रक्ताने डिंपल यांच्या कपाळावर आपल्या प्रेमाची मोहोर उमटवली होती. कुटुंबांमध्ये लग्नाच्या चर्चा सुरुच होत्या, पण इथे मात्र विक्रम आणि डिंपल एकमेकांचे आयुष्यभरासाठीचे साथीदार झाले होते. या साऱ्यामध्येच कारगिल युद्धाची घोषणा झाली आणि बत्रा यांना बोलवण्यात आलं.

देशाच्या रक्षणासाठी तत्पर असणाऱ्या बत्रा यांनी लगेचच धाव घेत आपली कर्तव्यनिष्ठा दाखवून दिली. शत्रूला सामोरं जातेवेळी ते जराही डगमगले नव्हते. किंबहुना युद्धभूमीवर भेकड शत्रूशी दोन हात करतेवेळी त्यांनी अनेकांनाच प्रोत्साहितही केलं. पण, अखेर शत्रूने डाव साधला आणि कॅप्टन विक्रम बत्रा यांच्यावर निशाणा धरला. कारगिलच्या या युद्धात विक्रम बत्रा यांनी महत्त्वपूर्ण योगदान देत या देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. ७ जुलै १९९९ या दिवशी युद्धभूमीवर भारतमातेच्या या सुपूत्राने अखेरचा श्वास घेतला. खरंतर त्याच क्षणाला विक्रम यांच्यासोबत डिंपलनेही स्वत:चा आत्मा हरपला होता. एका सैनिकाच्या प्रेमकहाणीचा हा करुण अंत असला तरीही डिंपल यांनी आपल्या प्रेमाचा कायम अभिमान बाळगला. पुढे कधीच लग्न न करण्याचा निर्णय घेत डिंपल यांनी कॅप्टन बत्रांसाठी आपलं आयुष्य बहाल केलं आणि पुन्हा एकदा प्रेम कायमच अमर असतं हे सिद्ध करुन दिलं.