लिंगायत समाजाला धार्मिक अल्पसंख्यांकाचा दर्जा देणं म्हणजे हिंदूंचं विभाजन करण्याचं पाऊल आहे, लिंगायत समाजाला हिंदू धर्मापासून तोडण्याचा हा डाव आहे असं भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी म्हटलं आहे.

”लिंगायत समाजाचं विभाजन होऊ देऊ नका अशी लिंगायत समाजातील अनेक महंतांची मागणी आहे. हे विभाजन होणार नाही, जोपर्यंत भाजपा आहे तोपर्यंत कोणतंही विभाजन होणार नाही, यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. लिंगायत समाजाला धार्मिक अल्पसंख्यांकाचा दर्जा देण्याची शिफारस केंद्र सरकार मान्य करणार नाही” असं महंतांसोबत बोलताना शाह यांनी स्पष्ट केलं आहे.

कर्नाटकातील सिद्धरामय्या सरकारने लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला असून चेंडू केंद्र सरकारकडे टोलवला आहे. काँग्रेस सरकारच्या या निर्णयाला भाजपाने प्रखर विरोध केला आहे.

लिंगायतांना अल्पसंख्याक धर्माचा दर्जा मिळाला तर कलम २५,२८,२९ आणि ३० अंतर्गत फायदे मिळतील. कर्नाटकात लिंगायत समाजाची लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या १७ टक्के आहे. कर्नाटकमध्ये 12 मे रोजी 224 जागांसाठी एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. 4 कोटी 96 लाख मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावतील. 24 एप्रिल अर्ज भरण्याची अंतिम मुदत असून 27 एप्रिल अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे.