पाकिस्तानमध्ये काश्मिरी जिहादी टोळ्या मोठय़ा प्रमाणात सक्रिय आहेत. देशातील दहशतवाद आणि अराजकतेस या टोळ्याच मोठय़ा प्रमाणात कारणीभूत असल्याचे क्रिकेटकडून राजकारणाकडे वळलेल्या इमरान खान यांच्या राजकीय पक्षाने कबूल केले आहे. काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करणाऱ्या दहशतवादी संघटना पाकिस्तानात आश्रय घेत असल्याचे प्रथमच पाकिस्तानातील एका राजकीय पक्षाने कबूल केल्यामुळे पाकिस्तानचा खरा चेहरा समोर आला आहे.
११ मे रोजी पाकिस्तानात होणाऱ्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर इमरान खानच्या पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ पक्षाने नव्याने सुरू केलेल्या संकेतस्थळावर नवीन पाकिस्तानची योजना या नावाने माहिती प्रसिद्ध केली. पाकिस्तानात दहशतवाद आणि अराजकता माजण्यास कारणीभूत असलेल्या सहा मुद्दय़ांचा उल्लेख या घोषणापत्रात करण्यात आला आहे. यामध्ये अफगाणिस्तानात तालिबान विरोधी चळवळ, पाकिस्तानी तालिबान संघटनेकडून शरियाची स्वत:ची व्याख्या लादण्याचा प्रयत्न, काश्मिरी जेहादी संघटना पाकिस्तानात सक्रिय, जातीय हिंसाचार विशेषत: शिया- सुन्नी हत्याकांड, बलुचिस्तानातील मताधिकाराचा मुद्दा आदी दहशतवाद अराजकतेस कारणीभूत असल्याचे म्हटले आहे.
भारतविरोधी कारवाया करणाऱ्या हिजबूल मुजाहिदीन आणि अल बदर मुजाहिदीनसारख्या दहशतवादी संघटना उघडपणे पाकव्याप्त काश्मीरमध्ये आपले बस्तान मांडून कारवाया करीत आहेत आणि पाकिस्तानातील राजकीय पक्षांनी त्याकडे दुर्लक्ष करून अशा प्रकारच्या संघटना पाकिस्तानात नसल्याचा दावा केल्याचे या संकेतस्थळावर म्हटले आहे.
पाकिस्तानातील राजकीय पक्ष निवडणुकीच्या काळातच आपल्या निवडणूक घोषणापत्रात काश्मिरी जनतेच्या लढय़ात आपण सोबत असल्याची भूमिका मांडण्याचे नाटक करतात. याशिवाय परराष्ट्र मंत्रालयदेखील काश्मीर जनतेच्या बाबतीत वरवरची भूमिका मांडत असल्याची टीकाही इमरान खानच्या पक्षाने केली आहे.
पाकिस्तानातील निवडणुकीच्या धामधुमीत एका राजकीय पक्षानेच भारतविरोधी कारवाया करणाऱ्या दहशतवादी संघटना पाकिस्तानात आश्रय घेत असल्याचे प्रथमच कबूल केले. दहशतवादी कारवायांबाबत भारताने वेळोवेळी पाकिस्तानकडे तक्रार केली. मात्र प्रत्येक वेळी भारताचा आरोप फेटाळणाऱ्या पाकिस्तानला आता घरच्याच राजकीय पक्षाने घरचा अहेर दिला आहे. दरम्यान, इमरान खान यांनी ९ एप्रिल रोजी आपल्या पक्षाचे निवडणूक घोषणापत्र प्रसिद्ध केले असून त्यामध्ये देशातील सुरक्षिततेबद्दलचा मुद्दा मांडण्यात आला होता. मात्र भारतातील दहशवादाबाबतचा मुद्दा नव्हता. ‘नवीन पाकिस्तान योजना’ या संकेतस्थळावरील मजकुरात भारतातील दहशतवादाबाबतचा जो मजकूर होता तो पक्षाच्या काही ज्येष्ठ नेत्यांच्या लक्षात आल्यानंतर काढून टाकण्यात आल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.