जम्मू आणि काश्मीरमध्ये स्थिती शांत आहे, याची खात्री जागतिक पातळीवर पटावी या हेतूने ऑक्टोबरच्या मध्यावर होणार असलेली ‘जागतिक गुंतवणूक परिषद’ पुढे ढकलण्यात आली आहे. ही परिषद आता नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता गुरुवारी सूत्रांनी व्यक्त केली.

काश्मीरमधील परिस्थिती सुरळीत असल्याची ग्वाही केंद्र सरकारने वेळोवेळी दिली आहे. काश्मीरचा विशेष दर्जा रद्द झाल्याने तेथे जमीन घेणे शक्य झाले असून त्यामुळे उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी ही परिषद होणार होती. महिनाभरात काश्मीरमधील परिस्थिती सुरळीत होईल, असे सांगत या परिषदेची घोषणा जम्मू आणि काश्मीर प्रशासनाचे मुख्य उद्योग सचिव एन. के. चौधरी यांनी केली होती.

मात्र सर्वसामान्य लोकांवर असलेले काही निर्बंध, राजकीय नेत्यांची स्थानबद्धता आणि राजकीय कार्यकर्त्यांचा सुरू असलेला तुरुंगवास महिनाभरानंतरही कायम असल्याच्या पार्श्वभूमीवर ही परिषद पुढे ढकलली गेली आहे.

आता काश्मीरमधील परिस्थितीचा वेळोवेळी आढावा घेण्यासाठी आणि तेथील विकासाला चालना देण्यासाठी केंद्रीय मंत्र्याचे दौरे आखले जात आहेत. काश्मीरमधील राजकीय नेत्यांची स्थानबद्धता कधी संपणार, असे विचारता सूत्रांनी सांगितले की, आधी सर्वसामान्य लोकांच्या फिरण्यावरील निर्बंध काढून टाकले आहेत, दूरध्वनी सेवा सुरळीत झाली आहे, काही भागांत मोबाइल सेवाही पूर्ववत झाल आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन राजकीय नेत्यांच्या सुटकेबाबत परिस्थितीनुरूप निर्णय घेतील.

पाकची क्षेपणास्त्र चाचणी

‘गझनवी’ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केल्याची घोषणा पाकिस्तानने गुरुवारी केली. २९० किलोमीटरच्या परीघात जमिनीवरून जमिनीवर मारा करण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे.  या चाचणीसाठीच पाकिस्तानने बुधवारी कराचीकडे जाणारे तीन हवाई मार्ग वाहतुकीसाठी बंद केले होते, असे सूत्रांकडून समजते.

गुजरातमध्ये अतिदक्षतेचा इशारा

सागरी मार्गाने पाकिस्तानचे कमांडो आणि दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिल्यानंतर गुजरातच्या कच्छ जिल्ह्य़ातील कांडला आणि मुंद्रा बंदर आणि अन्य महत्त्वाच्या ठिकाणी अतिदक्षतेचा इशारा देत बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. समुद्रमार्गे येणारे हे कमांडो अथवा दहशतवादी धार्मिक हिंसाचाराचा उद्रेक किंवा दहशतवादी हल्ले करण्याचा प्रयत्न करतील, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागली आहे. मुंद्रा बंदर अदानी समूहाच्या वतीने चालविण्यात येत असून ते देशातील मोठय़ा बंदरांपैकी एक आहे, त्याचप्रमाणे कांडला बंदराचीही मोठय़ा प्रमाणावर मालाची हाताळणी करण्याची क्षमता आहे. ही दोन्ही बंदरे कच्छच्या आखातामध्ये पाकिस्तानच्या जवळ आहेत. या क्षेत्रामध्ये जामनगर येथे जगातील सर्वात मोठा तेल शुद्धीकरण प्रकल्प असून तो रिलायन्स समूहामार्फत चालविण्यात येत आहे, तर वाडीनार येथे रॉसनेफ्ट या रशियातील कंपनीमार्फतही याच प्रकारचा प्रकल्प चालविण्यात येत आहे.

शेजारधर्म पाळा!

जम्मू-काश्मीरबाबत पाकिस्तानी नेतृत्व अत्यंत बेजबाबदार वक्तव्ये करीत असून त्यातून भीती पसरवण्याचा त्यांचा डाव आहे, अशी टीका गुरुवारी भारताने केली. पाकिस्तानने शेजारधर्म नीट पाळावा, अशी समजही भारताने दिली आहे. पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांना लिहिलेल्या पत्राचीही परराष्ट्र प्रवक्ते रवीश कुमार यांनी टर्र उडवली.  पाकिस्तानने त्यांच्या घरात काय सुरू आहे ते आधी पाहावे. त्यांचे घर जळते आहे हे सर्वाना ठाऊक आहे, असा टोलाही कुमार यांनी लगावला.

इंटरनेट बंदच

पाकिस्तानने भारतविरोधी हिंसाचाराचे इशारे दिल्याने जम्मू आणि काश्मीरमधील इंटरनेट सेवा इतक्यात सुरू केली जाणार नसल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.