जम्मू-काश्मीरमध्ये एका मुलीच्या विनयभंगाच्या कथित प्रकरणानंतरच्या धुमश्चक्रीत मंगळवारपासून पाचजण गोळीबारात ठार झाले होते. त्यानंतर काश्मीरमध्ये बंद केलेली इंटरनेट मोबाईल सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. लोकांच्या हालचालींवर घालण्यात आलेले र्निबधही तीन तासांसाठी उठवण्यात आले आहेत.

मोबाईल इंटरनेट सेवा मध्यरात्रीपासून पुन्हा सुरू करण्यात आली असून काश्मीर खोऱ्यात कालपासून अनुचित घटना न घडल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. हांडवारा व कूपवाडा येथे मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. अधिकाऱ्यांनी सकाळी ८ ते ११ दरम्यान संचारबंदी उठवली होती. या काळात शांतता राहिल्यास पूर्ण दिवसभर संचारबंदी उठवली जाईल असे सांगण्यात आले. काश्मीरमध्ये आता परिस्थिती पूर्वपदावर आली असून निषेधांमुळे गेले काही दिवस जनजीवन विस्कळित झाले होते. बारामुल्ला, बनीहाल दरम्यान रेल्वेसेवा काल सकाळपासून पुन्हा सुरू झाली. ही सेवा चार दिवस बंद होती.

दोषींना शिक्षा करणार- मेहबुबा

जम्मू व काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी सांगितले की, हांडवारा व कूपवाडातील घटनांना जे जबाबदार असतील त्यांना कठोर शिक्षा केली जाईल. शांतता प्रस्थापित करणे हे काश्मीरच्या विकासासाठी आवश्यक आहे. लोकांनी विशेष करून युवकांनी शांतता पाळावी, जे लोक हिंसाचारास जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. हांडवारा व कूपवाडा येथे धुमश्चक्रीत पाचजण ठार झाले आहेत. उपमुख्यमंत्री निर्मल सिंह यांनी सांगितले की, आताच्या हिंसाचारामागे कट आहे. कूपवाडा व हांडवारा येथे अशांतता पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशविरोधी, लोकविरोधी शक्ती अफवा पसरवण्यात यशस्वी होत आहेत. मी मेहबुबा यांच्या समवेत कूपवाडाला जाऊन आलो तेथे तणाव आहे, पण एरवी कूपवाडा हा शांत भाग आहे, तेथील हिंसाचार दुर्दैवी असून सरकार अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होणार नाही याची काळजी घेईल. मंगळवारी एका सैनिकाने मुलीचा विनयभंग केल्याच्या कथित प्रकरणानंतर जमावाने सुरक्षा दलांवर दगडफेक केली होती. सुरक्षा दलांच्या गोळीबारात तीनजण मारले गेले होते, तर द्रुगमुल्ला येथे सुरक्षा दलांच्या कारवाईत दोनजण मारले गेले होते.

राजौरी येथील विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या २ गटांत संघर्ष

जम्मू- जम्मू- काश्मीरच्या राजौरी येथील बाबा गुलाम शाह बादशाह विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या दोन गटात सोमवारी संघर्ष उद्भवून दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडांचा मारा केला, तसेच चार वाहने पेटवून दिली. पोलिसांनी त्वरित घटनास्थळी पोहचून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. या विद्यापीठात शिकणारे स्थानिक विद्यार्थी आणि काश्मीर खोऱ्यातील विद्यार्थी या दोन गटात कुठल्यातरी मुद्दय़ावर संघर्ष झाल्याचे राजौरी क्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक जॉनी विल्यम्स यांनी सांगितले.  गेले काही दिवस या दोन गटांमध्ये तणाव होता, परंतु आम्ही हा वाद सोडवू असे विद्यापीठाने सांगितले होते. मात्र सोमवारी दोन्ही गटांचा संघर्ष होऊन त्यांनी एकमेकांवर दगडफेक केली आणि २-३ मोटारसायकलसह चार वाहनांना आग लावली, असे ते म्हणाले.