जिंद (हरयाणा) : काश्मीरला विशेष दर्जा देणारे अनुच्छेद ३७० रद्द करणे हा निर्णय देशाच्या एकतेसाठी एक महत्त्वाचा टप्पा होता, असे मत गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केले. मतपेढीच्या हव्यासापोटी काँग्रेसने हा निर्णय घेतला नाही, असा आरोप त्यांनी येथील मेळाव्यात केला.

जाटबहुल भाग अशी ओळख असलेल्या जिंदमध्ये स्थानिक नेते वीरेंद्र सिंह यांच्या पुढाकाराने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे पाच वर्षांपूर्वीच वीरेंद्र सिंह यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्याचा उल्लेख करत चांगल्या व्यक्तींचे भाजपमध्ये स्वागत आहे, असे शहा यांनी नमूद केले. हरयाणामध्ये ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूक होणे अपेक्षित आहे. भाजप राज्यात दोन तृतीयांश बहुमत मिळवेल असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला. केंद्रात पुन्हा सत्तेत आल्यानंतर केवळ ७५ दिवसांत सरकारने काश्मीरबाबत हा मोठा निर्णय घेतला. पूर्वीच्या सरकारांनी ७२ वर्षांमध्ये असा धाडसी निर्णय घेतला नव्हता असे शहा यांनी स्पष्ट केले. तिन्ही सेनादलांचा संयुक्त प्रमुख (सीडीएस) नेमण्याच्या निर्णयाचे त्यांनी कौतुक केले. १९९९ च्या कारगिल युद्धानंतर सीडीएसच्या निर्मितीबाबत शिफारस करण्यात आली होती. मात्र यापूर्वीच्या सरकारांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप शहा यांनी केला. भाषणात त्यांनी हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचे कौतुक केले. खट्टर यांनी  राज्यात भ्रष्टाचारमुक्त सरकार दिल्याचे शहा यांनी स्पष्ट केले.