ब्रिटनचे युवराज विल्यम आणि त्यांची पत्नी केट मिडलटन १४ ऑक्टोबरपासून पाकिस्तान दौऱ्यावर आहेत. आपल्या शाही दौऱ्यामध्ये पाकिस्तानमधील अनेक ठिकाणांना भेट दिली आहे. दरम्यान बुधवारी ब्रिटनच्या राजघराण्यातील या दांपत्यासाठी पाकिस्तानमधील ब्रिटीश राजदुतांनी विशेष मेजवानीचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे ब्रिटनच्या युवराज आणि त्यांच्या पत्नीसाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी हे दोघे चक्क एका खास रिक्षातून राष्ट्रीय स्मारकच्या परिसरातील हॉलमध्ये पोहचले.

हो तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण खरोखरच युवराज विल्यम आणि त्यांची पत्नी केट हे एका रिक्षातून कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहचले. केट यांनी हिरव्या रंगाचा चकमणारा गाऊन परिधान केला होता तर विल्यम यांनी गुडघ्यापर्यंत लांब असणारी भारतीय उपखंडातील पारंपारिक शेरवानी परिधान केली होती.


या दोघांना उच्चायुक्तालयामध्ये आणण्यासाठी खास रिक्षाची सोय करण्यात आली होती. वेगवेगळी नक्षी आणि चित्रे असणाऱ्या या रिक्षामध्ये जांभळ्या रंगाचे लाईट्स लावण्यात आले होते. पाकिस्तानमध्ये सामान्यांकडून मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या रिक्षामधून प्रवास करणाऱ्या वेगळा अनुभव शाही दांपत्याला घेता यावा म्हणून उच्चायुक्तालयाने हा आगळा वेगळा रिक्षाने प्रवास करण्याचा फंडा वापरला.

१४ ऑक्टोबर ते १८ ऑक्टोबरदरम्यानच्या पाकिस्तान दौऱ्याची सुरुवात या दोघांनी इस्लामाबाद येथील एका शाळेला भेट देऊन केली. येथे त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिक्षण महत्वाचे का असते याबद्दल विद्यार्थ्यांशी गप्पा मारल्या. २००६ साली वेल्सचे राजकुमार चार्ल्स आणि क्रानवेलच्या युवराज्ञी कॅमीला यांनी पाकिस्तानला भेट दिली होती. त्यानंतर मागील १३ वर्षांमध्ये ब्रिटनच्या राजघराण्यातील व्यक्तीने पाकिस्तानचा दौरा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. ब्रिटनच्या विनंतीवरुन पाकिस्तान सरकारने या दौऱ्याचे आयोजन केले आहे.

दरम्यान या पाकिस्तान दौऱ्याआधी या दोघांनी लंडनमधील आगा खान सेंटरला भेट दिली होती. यावेळी त्यांनी पाकिस्तानी संस्कृतीबद्दल माहिती घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी अधिकाऱ्यांबरोबर पाकिस्तानी संगितकार, आचारी, कलाकारांशीही चर्चा केली होती. केट आणि विल्यम यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानकडून कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.