केरळ पोलिसांनी नुकतेच एक निवेदन जाहीर केले आहे. त्यात तुम्हाला काही ठराविक क्रमांकावरुन कॉल येत असतील तर ते उचलू नका असे सांगण्यात आले आहे. इतकेच नाही तर या क्रमांकावरुन आलेला क़ल तुमच्याकडून मिस झाल्यास त्यावर पुन्हा कॉलही करु नका असे येथील नागरिकांना सांगण्यात आले आहे. हे क्रमांक +5 आणि +4 पासून सुरु होणारे असून ते संशयास्पद आणि अनोळखी असल्याचे या पत्रकात म्हटले आहे. बऱ्याच नागरिकांनी आम्हाला या दोन क्रमांकानी सुरुवात होणाऱ्या नंबरवरुन कॉल येत असल्याचे सांगितल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे. हे क्रमांक बोलिव्हीया देशातील असल्याचा अंदाज असून तेथील कोड +591 आहे.

हे कॉल कुठून येत आहेत याचा शोध घेण्यासाठी उच्च तंत्रज्ञानाने युक्त असे मोबाईल वापरण्यात येत आहेत. मात्र ते देशातून येत आहेत की परदेशातून याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. तसेच अशाप्रकारच्या क्रमांकावरुन आलेला कॉल मिस झाला आणि त्यावर पुन्हा कॉल केला तर बराच टॉकटाईम कट होत असल्याची तक्रार काही नागरिकांनी केल्याचेही पोलिसांनी सांगितले. हे सर्व लक्षात घेऊनच नागरिकांना या दोन्ही क्रमांकाने सुरु होणारे कॉल्स उचलू नका असे आवाहन करण्यात आले आहे.