केरळ येथील कोझीकोड या ठिकाणी असलेल्या एका महाविद्यालयीन प्राध्यापकाने मुस्लीम मुलींबाबत अश्लील शेरेबाजी केल्याचा आरोप होतो आहे. मुस्लीम मुली हिजाब व्यवस्थित परिधान करत नाहीत. आपल्या छातीचे प्रदर्शन कापलेल्या कलिंगडाप्रमाणे करत फिरतात असे वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप करत दोन विद्यार्थिनींनी टॉपलेस फोटो पोस्ट केले. आम्ही या कृतीतून  वक्तव्याचा निषेध केला असल्याचे या विद्यार्थिनींनी म्हटले आहे. हे फोटो काही काळातच व्हायरल झाले. फोटो व्हायरल झाल्यावर याची चर्चाही चांगलीच झाली. त्यामुळे फेसबुकने या दोन मुलींचे अकाऊंट बंद केले आणि हे फोटो काढून टाकले. मात्र या शिक्षकाचा निषेध केला जातो आहे. जोहर मुनावीवीर असे या शिक्षकाचे नाव आहे. कोझीकोड येथील फारूख ट्रेनिंग कॉलेजमध्ये तो शिकवतो.

शिक्षकाने केलेल्या या वक्तव्यावरून चांगलाच वाद निर्माण झाला आहे. महिलांसाठी काम करणाऱ्या संघटनांनी या शिक्षकाचा निषेध म्हणून त्याला अर्धी कापलेली कलिंगडे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. तर अनेक विद्यार्थिनीही या वक्तव्याचा निषेध सोशल मीडियावर आणि जाहीररित्याही करताना दिसत आहेत. आम्ही काय कपडे घालायचे, कसे दिसायचे हा आमचा अधिकार आहे. त्यावर शेरेबाजी करण्याचा अधिकार तुम्हाला कोणीही दिलेला नाही. कोणत्याही मुलीच्या शरीराबाबत अश्लील टिपण्णी करण्याचा अधिकार कोणालाही नाही असे या महाविद्यालयात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने म्हटले आहे.

फक्त याच महाविद्यालयातील नाही तर इतर महाविद्यालयातील विद्यार्थिनींनीही शिक्षकाच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला. ‘हिंदुस्थान टाइम्स’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे. या शिक्षकाने त्याच्याच महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनींबाबत जे वक्तव्य केले ते धक्कादायक आहे. एका शिक्षकाने असे वक्तव्य करावे ही बाब अत्यंत लाजिरवाणी आहे अशी प्रतिक्रिया अनेक मुलींनी व्यक्त केली आहे. तसेच या शिक्षकाविरोधात कठोर कारवाई करण्याचीही मागणी या मुलींनी केली आहे.