केरळच्या महिला आयोग अध्यक्षा एम. सी. जोसेफाईन (M. C. Josephine) यांनी एका टीव्ही चॅनलच्या लाईव्ह शोदरम्यान केलेलं एक वादग्रस्त वक्तव्य त्यांना चांगलंच भोवलं आहे. या वक्तव्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर दबाव आल्यानंतर त्यांना अखेर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागाला आहे. एएनआयनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. विशेष म्हणजे एका मल्याळी वृत्तवाहिनीने महिलांवरील कौटुंबिक अत्याचार आणि अन्याय या विषयावर हे चर्चासत्र आयोजित केलं होतं. या चर्चासत्रामध्ये महिलांसाठी काम करणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर महिला देखील उपस्थित होत्या. त्यांच्या समोरच जोसेफाईन यांनी असं विधान केल्यामुळे त्यावरून मोठा गदारोळ केरळमध्ये आणि सोशल मीडियावर झालेला पाहायला मिळाला.

नेमकं झालं काय?

एका मल्याळी वृत्तवाहिनीवर हे चर्चासत्र सुरू असताना केरळ महिला आयोगाच्या अध्यक्षा एम. सी. जोसेफाईन आपली भूमिका मांडत होत्या. फोन-इन सुविधेचा वापर करून एका महिलेने फोनवरून कार्यक्रमात आपली व्यथा मांडली. आपला नवरा आणि सासू आपल्याला घरी मारहाण करतात. त्याविषयी आपण अद्याप पोलिसांत तक्रार दाखल केलेली नाही किंवा त्याविषयी अद्याप कुणाला काही सांगितलेलं देखील नाही, असं या पीडित महिलेने फोनवरून सांगितलं. यावरून जोसेफाई यांचा ताबा सुटला आणि त्यांनी फोनवरच लाईव्ह शोदरम्यान त्या महिलेला सुनावलं. “मग भोगा तुम्ही”, असं विधान जोसेफाईन यांनी केलं.

 

हा प्रकार उघड झाल्यानंतर जोसेफाईन यांच्यावर चहुबाजूंनी टीका होऊ लागलीय. एक महिला आपली व्यथा सांगण्यासाठी पहिलं पाऊल उचलून हिंमत करून काहीतरी बोलत होती. त्यावेळी तिला तिच्यावरच्या अन्यायाविषयी बोलण्यासाठी प्रोत्साहन देण्याऐवजी तिच्याकडे दुर्लक्ष करून उलट तिलाच सुनावलं, अशी टीका त्यांच्यावर केली जाऊ लागली.

मला तसं बोलायला नको होतं…

दरम्यान, या प्रकारावरून चहुबाजूंनी टीका होऊ लागल्यानंतर जोसेफाईन यांनी या प्रकरणावरून माफी देखील मागितली. “एका महिलेने फोन करून तिचा नवरा आणि सासू अत्याचार करत असल्याचं सांगितलं. मला कळलं की तिने याविषयी एक तक्रार देखील केलेली नाही. आम्ही महिलांनी पोलिसांत तक्रार करावी यासाठी कायम सांगत असतो. यामुळे केस अधिक भक्कम होते. पण नंतर मला जाणवलं की मी तसं बोलायला नको होतं. जर माझ्या बोलण्याने संबंधित महिलेला वाईट वाटलं असेल, तर मी त्यासाठी माफी मागते”, असं जोसेफाईन म्हणाल्या.

 

मात्र, या प्रकारावरून सोशल मीडियासोबतच विरोधकांनी देखील मोठं रान उठवल्यानंतर अखेर एम. सी. जोसेफाईन यांनी केरळ महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.