पाकिस्तानच्या सैन्य कोर्टाने हेरगिरीच्या आरोपांखाली फाशीची शिक्षा सुनावलेले भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना नेदरलँडमधील द हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने (आयसीजे) आज मोठा दिलासा दिला. कोर्टाचा निकाल भारताच्या बाजूने लागला असून कुलभूषण जाधव यांच्या फाशीवर स्थगिती कायम ठेवण्यात आली आहे. १५-१ च्या फरकाने हा निकाल लागला आहे. यापूर्वी २०१७मध्ये आयसीजेने जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिली होती, त्यानंतर आपला निर्णय सुरक्षित ठेवला होता.

दक्षिण आशियाच्या आंतरराष्ट्रीय कायदेशीर सल्लागार रीमा ओमर यांच्या माहितीनुसार, आयसीजेने कुलभूषण जाधव प्रकरणी पाकिस्तानकडून भारतावर लावण्यात आलेल्या आरोपांना योग्य मानलेले नाही. २ वर्षे आणि दोन महिने आससीजेमध्ये १५ सदस्यीय खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरु होती. आज या प्रकरणावर निकाल देताना खंडपीठाने जाधव यांना काऊन्सेलर अॅक्सेस देण्याचाही आदेश दिला. तसेच पाकिस्तानने जाधव यांना सुनावलेल्या फाशीचा पुनर्विचार करावा, असे कोर्टाने म्हटले आहे. या शिक्षेचा पुनर्विचार होत नाही तोपर्यंत त्यांना दिलेली फाशीची शिक्षा स्थगित करण्यात येत असल्याचा आदेश यावेळी कोर्टाने दिला. दरम्यान, जाधव यांना कायदेशील मदत देण्यात यावी असेही कोर्टाने म्हटले आहे.

या प्रकरणात पाकिस्तानचे म्हणणे आहे की, हेरगिरीच्या आरोपात पाकिस्तानी सैन्याने मार्च २०१६ मध्ये जाधव यांना बलुचिस्तानमधून ताब्यात घेण्यात आले होते. मात्र, भारताने पाकचा हा दावा नेहमीच नाकारला आहे. भारताने म्हटले आहे की, जाधव हे भारतीय नौदलाचे अधिकारी होते. त्यांचे इराणमधून अपहरण करुन पाकिस्तानात आणण्यात आले होते. जाधव यांचा इराणमध्ये स्वतःचा व्यवसाय आहे. त्यामुळे भारताने पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचे उल्लंघन केल्याचा दावा करीत आयसीजेमध्ये खटला दाखल केला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाकिस्तानच्या एका लष्करी कोर्टाने देशात हेरगिरी करण्यास आणि दहशतवाद पसरवण्याच्या आरोपांखाली एप्रिल २०१७ मध्ये जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. आयसीजेने पाकिस्तानला सांगितले की, त्यांचा निकाल येईपर्यंत जाधव यांना देण्यात येणारी फाशीची शिक्षा स्थगित करावी. भारताने आयसीजेकडे जाधव यांची फाशीची शिक्षा रद्द करीत त्वरीत सुटकेची मागणी केली होती. जाधव यांना दोषी ठरवताना आवश्यक प्रक्रियांचे पाकिस्तानच्या लष्करी कोर्टाने जराही पालन केले नसल्याचा आरोपही भारताने केला होता.