भारतातील सात प्रसिध्द कंपनीच्या कार ‘क्रॅश टेस्ट’मध्ये नापास झाल्या आहेत. ज्या गाड्यांवर हा प्रयोग करण्यात आला त्यात महिंद्राची स्कॉर्पियो, ह्युंदाईची इऑन, मारुतीची सेलेरिओ, मारुती सुझुकीची इको आणि रेनोची क्विड या गाड्यांचा समावेश आहे. परीक्षणादरम्यान ताशी ६४ किलोमीटर वेगाने पळवत या गाड्यांची ‘क्रॅश टेस्ट’ घेतली असता सर्व गाड्या या टेस्टमध्ये नापास झाल्या. ही टेस्ट ‘ग्लोबल न्यू कार एसेसमेंट प्रोग्राम’ (NACP) द्वारे करण्यात आली होती. यूकेमधील या संस्थेने सर्व गाड्यांना टेस्टमध्ये नापास ठरवत शून्य अंक दिले. मागील तीन वर्षात एनएसीपीने १६ गाड्यांवर ही टेस्ट केली. ज्यात टोयोटा आणि फॉक्सवॅगनच्या गाड्यांनी ४ अंक मिळवले. २०१४ मध्ये मारुतीची स्विफ्ट आणि डेटसन गो देखील या टेस्टमध्ये नापास झाली होती. भारतात अशाप्रकारचे परीक्षण करण्यासाठी ‘भारत न्यू व्हेइकल सेफ्टी एसेसमेंट प्रोग्रॅम’ (Bharat NCAP) नावाची संस्था आहे. सोमवारी संपन्न झालेल्या या कार्यक्रमात भारतातील चाचणी परीक्षणाला जगभरातील इतर देशांमधील चाचणी परीक्षण कार्यक्रमाशी जोडण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. या चाचणीसाठीची इतर देशातील वेगमर्यादा ताशी ६४ किलोमीटर असून, भारतीय संस्थेमार्फत करण्यात येणाऱ्या चाचणीसाठी ही वेगमर्यादा ताशी ५६ किलोमीटर असल्याने काही जणांकडून यास विरोध करण्यात येत आहे.