कोची : लक्षद्वीप बेटांच्या प्रशासकांनी आणखी काही निर्णय घोषित केले आहेत. त्यानुसार सुरक्षाविषयक माहिती मिळावी या हेतूने स्थानिकांच्या मासेमारी बोटीमध्ये त्या समुद्रात जातील त्यावेळी सरकारी अधिकारी तैनात करण्यास सांगण्यात आले आहे.

त्याशिवाय बेटावरील नारळाच्या झाडांपासून तयार होणाऱ्या कचऱ्याची शास्त्रीय विल्हेवाट लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.

लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल यांनी  हे आदेश हास्यास्पद असल्याचे सांगून ते तातडीने मागे घ्यावेत, अशी मागणी  केली आहे. २८ मे रोजी प्रधान सचिव तथा प्रशासकांचे सल्लागार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मासेमारीला जाणाऱ्या बोटीत जबाबदार सरकारी अधिकारी तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला. याच बैठकीत स्थानिक बोटी आणि त्यावरील कर्मचारी यांच्यावर निगराणी ठेवण्यासाठी  उपाय,  प्रवासी बोटी आणि जहाजांची तपासणी, बोटी उतरण्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही  आदी निर्णयही घेण्यात आले.