लोकसभेसाठी पाटलीपूत्र मतदारसंघातून उमेदवारी नाकारल्यामुळे नाराज होऊन लालूप्रसाद यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे राम कृपाल यादव यांनी पक्षातील आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. राम कृपाल यादव यांनी राष्ट्रीय जनता दल पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला असला तरी आपण अजूनही पक्षात असल्याचे सांगितले. पाटलीपूत्र मतदारसंघातून लालूप्रसाद यांची कन्या मिसा भारती यांना उमेदवारी देण्याचे जाहीर करण्यात झाल्यामुळे राम कृपाल यादव यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. त्यांनी पक्ष सोडू नये यासाठी लालुप्रसाद यांची कन्या मिसा भारती यांनीसुद्धा राम कृपाल यादव यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी बोलताना राजद पक्ष आजपर्यंत सामाजिक न्यायाच्या तत्वाला धरून असल्याचे यादव यांनी सांगितले. मात्र, ताज्या निर्णयांमुळे सामाजिक न्यायापेक्षा पक्षाला कौटुंबिक न्यायाची जास्त फिकीर असल्याचे दिसून येत असल्याचे राम कृपाल यादव यांनी सांगितले.