पूर्व लडाख सीमेवर काही भागातून चिनी सैन्य मागे हटलं आहे. पण परिस्थिती अजूनही सामान्य झालेली नाही. उलट पँगाँग टीएसओ तलाव क्षेत्रामुळे तणाव आणखी भडकण्याची चिन्हे आहेत. ताज्या उच्च क्षमतेच्या उपग्रह छायाचित्रांवरुन चीन फिंगर पाच आणि सहामध्ये सैन्य तैनाती वाढवत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पँगाँग टीएसओ क्षेत्रात परिस्थिती इतक्यात तरी सामान्य होणार नाही. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वँग वेनबिन बुधवारी लडाखमध्ये परिस्थिती सामान्य होत असून तणाव कमी होत असल्याचे म्हणाले होते. पण २९ जूनला स्पेस कंपनी मॅक्सारने उपग्रहांवरुन घेतलेली छायाचित्रे वेनबिन यांनी केलेल्या दाव्याच्या बिलकुल उलट स्थिती दाखवत आहेत. चिनी सैन्य फिंगर फोरवरुन मागे हटले असले तरी ते अजूनही फिंगर आठपर्यंत गेलेले नाहीत. त्यांनी आता फिंगर पाच मध्ये तळ ठोकला आहे.

पँगाँग तलावासह फिंगर पाच आणि सहा मध्ये चीनने अतिरिक्त सैन्यबळ तैनात करुन ठेवल्याचे या फोटोंवरुन स्पष्ट होते. फिंगर सिक्समध्ये नवीन तंबू, वस्तू साठवण्यासाठी स्टोरेजची व्यवस्था केली आहे. फिंगर फायमध्ये तंबू बरोबरच बोटी सुद्धा तलावात सज्ज असल्याचे फोटोंवरुन स्पष्ट झाले आहे. गलवान नदी खोऱ्याच्या भागात मात्र चिनी सैन्य ठरल्यानुसार मागे गेले आहे.

पूर्व लडाखमधील सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नसल्याचे गुरुवारी भारताने स्पष्ट केले. मात्र सैन्य मागे घेण्याच्या प्रक्रियेत प्रगती झाली असल्याचे भारताने म्हटले आहे.

भारत आणि चीनने सीमेवरील बहुसंख्य ठिकाणांहून आपापले सैन्य पूर्णपणे मागे घेतल्याचा दावा चीनच्या राजदूतांनी गुरुवारी केला होता. त्यानंतर भारताने हे स्पष्टीकरण दिले आहे.

सैन्य मागे घेण्याच्या प्रक्रियेत प्रगती झाली आहे, मात्र सैन्य पूर्णपणे मागे घेण्यात आलेले नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी मंगळवारी माध्यमांच्या प्रतिनिधींशी ऑनलाइन संवाद साधताना स्पष्ट केले होते.

‘चीन विरोधात उभं राहून आपली इच्छाशक्ती आणि क्षमता दाखवून दिली’

पूर्व लडाखमध्ये सीमारेषेवर भारताने चीनच्या आगळीकीला जे प्रत्युत्तर दिले, त्याचे अमेरिकेने कौतुक केले आहे. “अलीकडेच सीमावादात भारताने चीन विरोधात उभं राहून आपली इच्छाशक्ती आणि क्षमता दाखवून दिली” असे लिसा कर्टीस म्हणाल्या. त्या अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या दक्षिण मध्य आशियाच्या वरिष्ठ संचालक आहेत.

“पूर्व लडाखच्या सीमारेषेवर भारत-चीनमध्ये जे सुरु आहे, त्यावर इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील देशांचे लक्ष आहे. भारताने जो दृढ संकल्प दाखवला त्यातून या देशांना नक्कीच प्रेरणा मिळेल” असे लिसा कर्टीस म्हणाल्या. बुधवारी ब्रुकिंग्स इन्स्टिट्यूशनच्या वेबिनारमध्ये बोलताना त्यांनी हे विचार व्यक्त केले.