जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला गत दोन दिवसांत मोठे यश मिळाले आहे. शुक्रवारी (दि. १६) पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोएबाचा टॉप कमांडर जुनैद अहमद मट्टू चकमकीत ठार झाला. चकमक झालेल्या स्थळावरून जुनैदचा मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी आज ही माहिती दिली. सुरक्षा दलांनी गत महिन्यात १२ क्रूरकर्मा दहशतवाद्यांची नावे जाहीर केली होती. त्यामध्ये जुनैदचाही समावेश होता. जुनैदवर १० लाखांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. तो कुलगाममधील खुदवानी गावचा रहिवासी होता. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जुनैद काश्मीरमध्ये भारतीय सैन्यावर केलेल्या हल्ल्यात सहभागी होता. स्पेशल ऑपरेशन ग्रूप (एसओजी) आणि केंद्रीय राखीव दलाने (सीआरपीएफ) संयुक्त ऑपरेशन राबवून दोन दहशतवाद्यांनाही कंठस्नान घातले होते. हे तिन्ही दहशतवादी अनंतनाग येथील अरवानी गावातील एका घरात लपले होते.

दहशतवाद्यांच्या मृतदेहासोबत एक एके ४७ आणि सहा मॅगझीनसह तीन इतर हत्यारे जप्त करण्यात आली. दरम्यान, दहशतवादी आणि सुरक्षा दलात झालेल्या चकमकीत एका मुलासहित दोन नागरिकही ठार झाल्याचे वृत्त आहे. सुरक्षा दलांच्या मते ही कारवाई सुरू असताना काही लोक अत्यंत जवळून जवानांवर दगडफेक करत होते. त्यामुळे या लोकांना गोळी लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर श्रीनगर, त्राल, पम्पोर, पुलवामा, दक्षिण अनंतनागरसह खोऱ्यातील सुमारे डझनभर ठिकाणी सेना आणि आंदोलक आमनेसामने आले होते.

शुक्रवारी जुनैदला मारल्यानंतर राज्यातील दुसऱ्या भागात म्हणजे दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील अच्छाबल येथे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात सहा पोलीस कर्मचारी हुतात्मा झाले. अत्यंत क्रूररित्या त्यांची हत्या करण्यात आली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांच्या हत्येनंतर दहशतवाद्यांनी त्यांच्या मृतदेहांची विटंबना केली. हे सर्व पोलीस कर्मचारी सांयकाळी सातच्या सुमारास सुमो गाडीतून कामावरून परतत होते. त्यावेळी दहशतवाद्यांनी पोलिसांच्या पेट्रोलिंग टीमवर हल्ला करत अंदाधुंद गोळीबार केला. यात ६ पोलीस कर्मचारी ठार झाले. या हल्ल्याची जबाबदारी ‘लष्कर’ने घेतली होती.