‘आधार’ला बँक कर्मचाऱ्यांचाही विरोध!

‘आधार’ क्रमांक बँक खात्याशी जोडणे अनिवार्य असल्याचे भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेने शनिवारी स्पष्ट केले असले तरीही बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी त्यास विरोध दर्शवला आहे. आधार क्रमांकाची बँक खात्याशी जोडणी अनिवार्य नसून ऐच्छिक आहे आणि सरकारने त्यासंदर्भात नागरिकांना खुलासा करावा, असे एका संघटनेने म्हटले आहे. तर बँकांच्या कर्मचाऱ्यांवर आधीच कामाचा अतिरिक्त ताण असल्याने या कामाचा भार पेलणे अवघड आहे, असे अन्य संघटनांचे म्हणणे आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट सूचना मिळेपर्यंत आधार क्रमांक बँक खात्याशी जोडण्याचे काम स्थगित करावे, अशी मागणी सार्वजनिक क्षेत्रातील बँक अधिकाऱ्यांच्या संघटनेने केली आहे.

आधार क्रमांक बँक खात्यांशी जोडण्याचे काम सध्या काही खासगी संस्था करत आहेत. त्यांच्याकडून बँकांच्या कार्यालयातील जागेचा त्यासाठी उपयोग केला जात आहे. मात्र, आता त्या संस्थांकडून हे काम काढून घेऊन ते पूर्णपणे बँकेच्या कर्मचाऱ्यांनी करावे, अशा नव्या सूचना आल्या आहेत. काही बँकांनी त्यांच्या काही शाखा केवळ या कामासाठी वापरल्या जातील, असे स्पष्ट केले आहे. मात्र, सध्या नव्या नोकरभरतीवरील मर्यादा व सरकारच्या अन्य योजनांच्या अंमलबजावणीत अडकलेले बँक कर्मचारी यामुळे बँकिंग व्यवस्थेवर ताण पडलेला आहे. अनेक कामांचे बँकांनी यापूर्वीच आऊटसोर्सिग केले आहे. तरीही आधारचे काम बँकांनी करावे अशा सूचना दिल्या जात आहेत. ते पूर्णत: अव्यवहार्य आहे, असे ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे (एआयबीईए) सरचिटणीस सी. एच. व्यंकटचलम यांनी इंडियन बँक्स असोसिएशनच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. आम्ही या सूचनांचा तीव्र निषेध करत असून संबंधित अधिकाऱ्यांकडे हा विषय मांडून या सूचना मागे घ्याव्यात अशी विनंती करत आहोत, असेही व्यंकटचलम यांनी या पत्रात म्हटले आहे. तसेच आधार क्रमांक बँक खात्याशी जोडणे ऐच्छिक असल्याचे सरकारने नागरिकांना स्पष्ट करावे, अशी मागणी ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन (एआयबीओसी) या संघटनेने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.   १ जून २०१७ रोजी अधिकृत गॅझेटमध्ये प्रकाशित झालेल्या आर्थिक गैरव्यवहार (मेंटेनन्स ऑफ रेकॉर्ड्स) दुसरी सुधारणा नियम २०१७ नुसार लागू असलेल्या प्रकरणांमध्ये आधार क्रमांक बँक खात्याला जोडणे अनिवार्य आहे, असे मध्यवर्ती बँकेने एका निवेदनात सांगितले.

यापूर्वी जून महिन्यात सरकारने बँकेत खाते उघडण्यासाठी, तसेच ५० हजार रुपयांच्या व त्यावरील रकमेच्या कुठल्याही आर्थिक व्यवहारासाठी आधार अनिवार्य केले होते. त्यासाठी, युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (यूएडीएआय)ने जारी केलेला आधार क्रमांक सादर करण्यास बँकेच्या विद्यमान खातेदारांना सांगण्यात आले आहे. असे न केल्यास संबंधित खाते बंद होईल, असे सरकारच्या अधिसूचनेत म्हटले होते.

* आधार क्रमांक बँकेच्या खात्याशी जोडणे अनिवार्य करण्याबाबत आपण अद्याप कुठलेही निर्देश दिलेले नसल्याचे रिझव्‍‌र्ह बँकेने म्हटले असल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले होते.

* ‘आधार’ क्रमांक बँक खात्याला जोडणे अनिवार्य असल्याचे भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेने शनिवारी स्पष्ट केले.