उत्तर प्रदेशच्या कासगंज जिल्ह्यात काल रात्री दारु माफियाने पोलिसांवर हल्ला केला. यात एका पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला तर पोलीस उपनिरीक्षक गंभीररित्या जखमी झाले आहेत. पोलिसांवर झालेल्या या प्राणघातक हल्ल्यानंतर २४ तासांच्या आत यूपी पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये कॉन्स्टेबलच्या हत्येत सहभागी असलेल्या मुख्य आरोपीचा खात्मा केला आहे.

कासगंजमधील गावात दारु माफियाला वॉरंट देण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावरच उलटा हल्ला करण्यात आला. यामध्ये कॉन्स्टेबलला मरेपर्यंत मारहाण करण्यात आली तर पोलीस उपनिरीक्षक गंभीररित्या जखमी झाले अशी माहिती कासगंजचे पोलीस अधीक्षक मनोज सोनकर यांनी दिली. बुधवारी सकाळी एन्काऊंटरमध्ये पोलिसांनी मुख्य आरोपीचा खात्मा केला. दुसरा आरोपी अजून फरार आहे, असे पोलिसांनी सांगितले.

कासगंजमध्ये काय घडलं?
उत्तर प्रदेशच्या कासगंज जिल्ह्यात बेकायदा दारुच्या फॅक्टरीवर छापा मारण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या टीमवर मंगळवारी संध्याकाळी दारु माफियाने हल्ला केला. यामध्ये एका कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला तर पोलीस उपनिरीक्षक जखमी झाला.

देवेंद्र असे मृत कॉन्स्टेबलचे नाव आहे, तर पोलीस उपनिरीक्षक अशोक कुमार जखमी झाले. दारु माफियाच्या गुंडांनी पोलिसांचे कपडे काढून लाठया तसेच अन्य शस्त्रांनी त्यांना माराहण केली. इंडिया टुडेने हे म्हटले आहे.