करोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कमी न झाल्याने पश्चिम बंगालमध्ये ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ३१ जुलैपर्यंत लावण्यात आलेला लॉकडाउन ३१ ऑगस्टपर्यंत वाढवत असल्याचं जाहीर केलं आहे. ममता बॅनर्जी यांनी यावेळी सूट देत बकरी ईदला १ ऑगस्ट रोजी राज्यात लॉकडाउन नसेल असं स्पष्ट केलं आहे.

पश्चिम बंगालमध्ये आठवड्यातील दोन दिवस लॉकडाउन पाळण्यात येत आहे. ममता बॅनर्जी यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात २, ५, ८, ९, १६, १७, २३, २४ आणि ३१ ऑगस्ट रोजी संपूर्ण लॉकडाउन असणार आहे.

आणखी वाचा- जगाच्या तुलनेत भारतात वेगानं वाढतेय करोना रुग्णसंख्या; या राज्यात सर्वाधिक उद्रेक

लॉकडाउनदरम्यान सर्व सरकारी आणि खासगी कार्यालयं, व्यवसायिक आस्थापने, सार्वजनिक आणि खासगी वाहतूक बंद असणार आहे. फक्त अत्यावश्यक सेवा लॉकडाउनदरम्यान सुरु असणार आहेत. पेट्रोल पंप सुरु ठेवण्यासही परवानगी आहे. न्यायालयं, शेती, चहाचे मळे, मालवाहतूक आणि फूड डिलिव्हरीसाठी परवानगी देण्यात आली आहे.