अॅड. प्रकाश आंबेडकर हे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. प्रचार सभांचा धडाकाच त्यांनी लावला आहे. जनतेचा त्यांना मोठ्याप्रमाणात प्रतिसादही मिळताना दिसतोय. मात्र, दोन दिवसांपूर्वी सोलापूर येथे झालेल्या एका प्रचारसभेत आंबेडकर यांच्यासमोर त्यांच्या समर्थकाची जीभ घसरली. सोलापूर येथील नई जिंदगी हा परिसर मुस्लिम बहुल भाग आहे. आंबेडकर यांचे समर्थक माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड यांनी भरसभेत त्या परिसराला छोटा पाकिस्तान असे संबोधले. गायकवाड जेव्हा हे वक्तव्य करत होते. त्यावेळी मंचावर प्रकाश आंबेडकर हेही उपस्थित होते. परंतु, गायकवाड यांना कोणीच रोखले नाही. एवढेच नाही तर कॉँग्रेस आणि भाजपाच्या उमेदवारांबद्दलही त्यांची जीभ घसरली. दरम्यान, आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी प्रमोद गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आणि भाजपाचे डॉ. जयसिद्धेश्वर महाराज हे त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी आहेत.

उल्लेखनीय म्हणजे, प्रमोद गायकवाड यांनी छोटा पाकिस्तान असा उल्लेख केल्यानंतर सभेसाठी आलेल्या लोकांनीही जल्लोष केला होता. या प्रकरणी निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाचे अधिकारी अजयकुमार बचुटे यांनी एमआयडीसी पोलिसात फिर्याद दिली होती.

याच सभेत बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर टीका केली होती. ”आरएसएसला संविधानाच्या चौकटीत आणण्यासाठी कॉँग्रेसने गेल्या ६० वर्षात काहीच प्रयत्न केले नाहीत. १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी देश स्वतंत्र झाला. हा आनंदाचा दिवस असताना आरएसएसने हा दिवस काळा दिवस म्हणून पाळला. याबाबत आता ते या मुद्द्याला स्वीकारत नाहीत. मात्र या संघटनेच्या वृत्तपत्रातच त्याचा उल्लेख केला होता. साडेचार वर्षात भाजपाच्या काळात मुस्लिम बांधवांकडे पाहण्याचा दृष्टिकोन कलुषित झाला आहे, तो बदलणे गरजेचे असल्याचे” आंबेडकर म्हणाले.

आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी प्रमोद गायकवाड यांच्यासह सभेसाठी आयोजक म्हणून परवानगी घेतलेले अर्जदार श्रीशैल गायकवाड यांनी अटी व शर्थीचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्धही तक्रार नोंदविण्यात आली आहे.