उत्तर प्रदेशात विवाहासाठी जबरदस्तीने धर्मातर करण्याचे प्रकार रोखण्यासाठी जारी करण्यात आलेल्या धर्मातरविरोधी वटहुकमानुसार बरेली जिल्ह्यत पोलिसांनी पहिला गुन्हा दाखल केला असून एका मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार या गुन्ह्यची नोंद झाली आहे.

बरेली जिल्ह्यत देवरीनियान पोलिस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी हा गुन्हा दाखल झाला असून रविवारी अतिरिक्त मुख्य सचिव अवनीश अवस्थी यांनी सांगितले की, शरीफ नगर खेडय़ातील रहिवासी टिकाराम यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल केला आहे. बरेली जिल्ह्यतील देवरनियान ठाण्याच्या हद्दीत ही घटना झाली. उवैश अहमद या त्याच खेडय़ातील व्यक्तीने टिकाराम यांच्या मुलीला प्रलोभने दाखवून धर्मातर करण्याचा प्रयत्न केला. उवैश अहमद याच्या विरोधात नवीन धर्मातर कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी धर्मातरविरोधी वटहुकूम मंजूर केला होता. त्यानुसार कुणी विवाहासाठी प्रलोभने दाखवून धर्मातर केले तर १० वर्षे तुरुंगवास व पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा होणार आहे. उत्तर प्रदेश बेकायदा धर्मातर वटहुकूम २०२० चार दिवसांपूर्वी योगी आदित्यनाथ सरकारने तयार केला होता. त्यात विवाहाच्या निमित्ताने होत असलेल्या धर्मातरांना पायबंद घालण्याचा उद्देश आहे.

धर्मातरासाठी दबाव

वरिष्ठ पोलिस अधीक्षक रोहित सिंह सजवान यांनी सांगितले की, आरोपीला अटक करण्यासाठी पोलिस पथके तयार करण्यात आली आहेत. या घटनेत टिकारामची मुलगी व अहमद हे बारावीला एकत्र शिकत होते. तीन वर्षांपूर्वी अहमद याने मुलीवर धर्मातरासाठी दबाव आणला. तिने विरोध केल्यानंतर तिचे अपहरण केले नंतर मुलीचा दुसऱ्याच मुलाबरोबर जूनमध्ये विवाह झाला. तरी अहमदने तिचा माग सोडला नाही. त्याने तिच्या कुटुंबीयांचा छळ सुरू केला. तिला धर्मातर करून आपल्याशी विवाह करायला सांगा, असे अहमदचे म्हणणे होते. त्यामुळे टिकाराम यांनी पोलिसांत तक्रार दिली होती.