पत्रकार व माजी केंद्रीय मंत्री एम.जे अकबर यांनी पत्रकार प्रिया रामाणी यांच्या विरोधात बदनामीचा फौजदारी खटला दाखल केला असून या प्रकरणात दोघांमध्ये न्यायालयाबाहेर तडजोडीची शक्यता आजमावून पाहण्यात यावी, असे दिल्ली न्यायालयाने शनिवारी सांगितले.

वीस वर्षांपूर्वीच्या लैंगिक गैरवर्तणुकीच्या प्रकरणातील आरोपांबाबत अकबर यांनी रामाणी यांच्याविरोधात बदनामीचा खटला दाखल केला होता. अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी रवींद्र कुमार पांडे यांच्यासमोर शनिवारी अंतिम युक्तिवादाला सुरुवात झाली.  अकबर यांच्या वकील गीता लुथरा यांनी सांगितले, की ‘आमच्या अशिलांशी यााबबत बोलून निर्णय घ्यावा लागेल.’

रामाणी यांचे वकील भावुक चौहान यांनी सांगितले, की ‘या प्रकरणातील तथ्ये उघड असल्याने तडजोडीची शक्यता कमी आहे.’

न्यायालयाने दोन्ही पक्षांना तडजोडीच्या शक्यतेबाबत उत्तर तयार करुन २४ नोव्हेंबरला सुनावणीकरिता येण्यास सांगितले आहे.

आधी अतिरिक्त महानगर दंडाधिकारी विशाल पहुजा यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी सुरू होती. त्यांची बदली झाली आहे. अकबर यांनी १५ ऑक्टोबर २०१८ रोजी हा खटला दाखल केला आहे.