द्रमुकचे सर्वेसर्वा एम.करुणानिधी यांच्या निधनानंतर सर्वच स्तरांतून शोक व्यक्त करण्यात येत आहे. राजकारण म्हणू नका किंवा मग कलाविश्व, प्रत्येक क्षेत्रातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. यातच त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील काही आठवणींनाही उजाळा देण्यात येत आहे. राजकीय प्रवासात नेहमीच सूचक वक्तव्य करणाऱ्या करुणानिधी यांनी नेहमीच ठराविक समुदायावर आपली छाप सोडली. सध्या त्यांचं असंच एक वाक्य एका बलाढ्य नेत्याच्या मनात असणाऱ्या भावनांचा उद्रेक समोर आणत आहे.

जवळपास सात दशकांहून अधिक काळ त्यांनी तामिळनाडूच्या राजकारणात आपलं महत्त्वपूर्ण योगदान दिलं होतं. समाजहिताचे संदेश आपल्या पटकथांच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून झटणाऱ्या पटकथाकारापासून सुरु झालेला त्यांचा प्रवास राजकारणाच्या पटलावर येऊन थांबला. पण, २०१४ मध्ये तामिळनाडूच्या विधानसभेतून बाहेर पडताना त्यांनी स्पष्ट शब्दांमध्ये सत्ताधाऱ्यांविषयी खंत व्यक्त केली होती. तामिळनाडूच्या विधानसभेत आपल्यासारख्या अपंग व्यक्तीला बसण्यासाठी व्यवस्थाही करण्यात आली नसल्याचं म्हणत त्यांनी विधानसभेतून काढता पाय घेतला होता.

वाचा : हा माझ्या आयुष्यातील सर्वात काळा दिवस- रजनीकांत 

‘विधानसभेत माझ्यासारख्या अपंग व्यक्तीला जागा नाही. मी तेथून निघूनच जावं यासाठी सत्ताधारी जणू काही प्रयत्नच करत होते, हे पाहून मला अत्यंत दु:ख झालं. मी जवळपास ५० वर्षे आमदारकी भुषवली, पण आता मात्र मी विरोधी पक्षनेतेपदासाठीही पात्र नाही. अशा प्रकारची अवहेलना होईल याची मी कधीच अपेक्षाही केली नव्हती’, असं म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांनी दिलेल्या वागणुकीबद्दल खंत व्यक्त केली होती. २००९ मध्ये मणक्याची शस्त्रक्रीया झाल्यानंतर ते व्हिलचेअरचा वापर करु लागले होते. पण, आपल्याला विधानसभेत सत्ताधाऱ्याकडून दिल्या जाणाऱ्या वागणूकीबद्दल मात्र त्यांच्या मनात कटुता होती.