पबजी गेम खेळण्याच्या नादात एक युवक पाणी समजून अ‍ॅसिड प्यायला. मध्य प्रदेशात भोपाळमध्ये ट्रेन प्रवासात ही धक्कादायक घटना घडली. सौरभ यादव आणि संतोष शर्मा हे दोन युवक स्वर्ण जयंती एक्सप्रेस ट्रेनने आग्र्याला चालले होते. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

नेमकं काय घडलं
संतोष शर्माचा ज्वेलर्सचा व्यवसाय आहे. दागिने स्वच्छ करण्यासाठी अ‍ॅसिडची गरज लागते. त्यामुळे त्याच्या बॅगेमध्ये अ‍ॅसिडची बाटली होती. ट्रेनमध्ये सौरभ यादव गेम खेळण्यामध्ये एकदम गुंग झाला होता. त्याने कानाला हेडफोन्स लावले होते. खेळण्याच्या नादात तहान लागली म्हणून सौरभ यादवने शर्माच्या बॅगेतून अ‍ॅसिडची बाटली काढली व पाणी समजून तो अ‍ॅसिड प्यायला.

शर्माला सौरभ यादवला रोखण्याचीही संधी मिळाली नाही. काही सेकंदात हा प्रकार घडला. सौरभच्या शरीरात बऱ्यापैकी अ‍ॅसिड गेले होते. ट्रेन ढोलपूर येथे थांबत नसल्यामुळे सौरभला वेळेत योग्य उपचार मिळू शकले नाहीत. ट्रेन आग्र्याला पोहोचण्याआधीच त्याचा मृत्यू झाला.

शर्माने आपण ज्वेलर्स असून आग्र्याच्या सराफा बाजारमध्ये आपले नेहमी येणे-जाणे सुरु असते असे पोलिसांना सांगितले. रेल्वे पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. सौरभच्या कुटुंबाने संतोष शर्मावर जाणूनबुजून अ‍ॅसिड पाजल्याचा आरोप केला आहे. मध्य प्रदेशातील ही दुसरी अशी घटना आहे. छिंदवाडामध्ये सुद्धा एक युवक खेळण्याच्या नादात पाणी समजून अ‍ॅसिड प्यायला होता. सुदैवाने तो बचावला.