उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत हे करोनामधून पूर्णपणे बरे झाले असून सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमांना उपस्थिती लावू लागले आहेत. मात्र अशाच एका सर्वजनिक कार्यक्रमामध्ये बोलताना मंगळवारी तीरथ सिंह रावत यांनी करोना कालावधीमध्येही महाकुंभचे आयोजन करणं बरोबर असल्याचं मत व्यक्त केलं आहे. एएनआयने यासंदर्भातील व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केलाय.

नक्की वाचा >> “अमेरिकेने भारतावर २०० वर्षे राज्य केलं”; मोदींचं कौतुक करता करता उत्तराखंडचे मुख्यमंत्री भरकटले

“महाकुंभ १२ वर्षातून एकदा येतो, दरवर्षी येत नाही. जत्रा दरवर्षी होतात आणि कुठेही होऊ शकतात. मात्र कुंभ हा हरिद्वारमध्येच होतो आणि १२ वर्षातून एकदाच होतो. हरिद्वार, बनारस आणि उज्जैनमध्येच महाकुंभ होतो. त्यामुळेच महाकुंभचे भव्यदिव्य आयोजन करण्यात आलं पाहिजे,” असं मत रावत यांनी व्यक्त केलं आहे. करोनामुळे संपूर्ण जग त्रासलेलं आहे. मात्र पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आपण त्याच्याविरोधात लढाई यशस्वीपणे लढत असल्याचंही रावत यांनी म्हटलं आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर कुंभचे आयोजन करण्यात यावे की नाही यासंदर्भात मतमतांतरे असतानाच मुख्यमंत्री रावत यांनी करोना असला तरी कुंभचे भव्यदिव्य आयोजन केलं पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे.

नक्की वाचा >> “भगवान श्री राम आणि भगवान श्री कृष्णाप्रमाणे भविष्यात लोकं मोदींचीही पूजा करतील”

देशभरात सुरू असलेल्या करोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंधांसह उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये गंगा नदीच्या तीरावर १ एप्रिलपासून कुंभमेळ्याला विधीपूर्वक सुरुवात झाली. मेळ्याच्या पार्श्वभूमीवर उत्तराखंडच्या सीमांवर, उत्तर प्रदेशच्या रुरकीतील नरसन आणि उधमसिंगनगर जिल्ह्यातील काशीपूर येथे कडक तपासणी करण्यात येत आहे. ज्यांच्या आरटी-पीसीआर चाचणी अहवाल नकारात्मक आहे अशांनाच प्रवेश देण्यात येत आहे. कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांचा आरटी-पीसीआर चाचणी अहवाल हा जास्तीत जास्त ७२ तासांपूर्वीचा असणे अनिवार्य आहे. तसेच करोना लसीचा पहिला डोस घेतलेल्या भाविकांसाठीही हा नियम लागू असून सर्व भाविकांनी करोना प्रतिबंधक नियमांचे पालन करणे अनिवार्य असल्याचे, उत्तराखंड उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

नक्की वाचा >> “CM साहेब, जीन्स नाही तुमचा मेंदू फाटलाय”; महिला नेत्या तीरथ सिंह रावतांवर संतापल्या

अशी आहे कुंभसाठी तयारी

इतिहासात प्रथमच करोनामुळे कुंभमेळ्याचा कालावधी चार महिन्यांऐवजी केवळ एक महिन्याचा करण्यात आला आहे. १ ते ३० एप्रिलदरम्यान होणाऱ्या या मेळ्यात १२, १४ आणि २७ एप्रिल रोजी शाही स्नान असणार आहे. १३ एप्रिल रोजी असणाऱ्या गुढीपाडवा आणि २१ एप्रिलला असणाऱ्या रामनवमीच्या निमित्तानेही येथे मोठ्या प्रमाणात भाविक येण्याची शक्यता आहे. हरिद्वार, डेहराडून आणि टिहरी जिल्ह््यातील अनेक ठिकाणांनी कुंभक्षेत्र व्यापले आहे. मेळ्यादरम्यान, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी एकूण १२ हजार पोलीस, निमलष्करी दलाचे ४०० जवान हरिद्वार ते देवप्रयागपर्यंतच्या ६७० हेक्टरमध्ये पसरलेल्या कुंभ क्षेत्रावर लक्ष ठेवतील. कुंभमेळ्याच्या भेट देणाऱ्यांसाठी २०० डॉक्टर आणि १५०० पॅरामेडिकल कर्मचारी तैनात असून ३८ तात्पुरती रुग्णालये उभारण्यात आली आहेत.