आज लोकसंख्या वाढत आहे त्यामुळेच बलात्काराच्या गुन्ह्य़ांतही वाढ होत आहे, असा शोध पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लावला आहे. राज्य विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेचा समारोप करताना, दिल्लीच्या तुलनेत राज्यातील बलात्कारांची संख्या कमी असल्याचेही बॅनर्जी यांनी आपल्या भाषणात नमूद केले.
त्या म्हणाल्या, आज लोकसंख्या वाढत आहे. बिधानचंद्र रॉय यांच्या काळी जेवढई लोकसंख्या होती तेवढी कमी लोकसंख्या आज आहे का? विरोधक कायदा व सुव्यवस्थेबद्दल तावातावाने बोलतात. बलात्कारांत वाढ झाल्याची ओरड करतात. पण आज लोकसंख्या वाढत आहे. मोटारगाडय़ांची संख्या वाढत आहे. पायाभूत क्षेत्र वाढत आहे. मॉलची संख्या वाढत आहे. तरुण-तरुणी नवविचारांनी भारत आहेत. तुम्ही त्याचे स्वागत करता की नाही?
प्रसिद्धी माध्यमे जाणीवपूर्वक बलात्काराच्या बातम्यांना अवास्तव प्रसिद्धी देत आहेत, असा आरोप करीत त्या म्हणाल्या, पूर्वी बलात्कारित स्त्रीला त्याबद्दल बोलायचाही संकोच वाटायचा. आज सामाजिक जाणीव वाढली आहे. आज महिला तक्रार नोंदवण्यासाठी घाबरत नाहीत. ही चांगलीच गोष्ट आहे. पूर्वी तक्रारीही नोंदल्या जात नव्हत्या. त्यामुळे ती आकडेवारी आज सांगून आजचे चित्र रंगवू नका.
बलात्काराचा एकही गुन्हा होऊ नये, असे आपले ठाम मत आहे, असे स्पष्ट करीत त्यांनी राज्यातील बलात्काराच्या गुन्ह्य़ांची आकडेवारीही पटलावर ठेवली. २०११ मध्ये बलात्काराचे गुन्हे दिल्लीत ४५३, मुंबईत २२१, बंगळुरूत ९७, चेन्नईत ७६ तर कोलकात्यात ३८ नोंदवले गेले, असे त्यांनी सांगितले.