तृणमूल युवा काँग्रेसचे अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी भाजपाचे अध्यक्ष अमित शाहंवर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. याप्रकरणी शाह यांना समन्स जारी करण्यात आले असून येत्या २८ सप्टेंबर रोजी त्यांना न्यायालयात उपस्थित राहण्यास सांगितले आहे. ११ ऑगस्ट रोजी कोलकाता येथे झालेल्या एका जाहीर सभेत अमित शाह यांनी अपमानजनक वक्तव्य केल्याचा आरोप अभिषेक यांनी केला आहे. या नोटिसीमुळे अमित शाह यांच्यासमोरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

अभिषेक यांनी स्वरूप विश्वास आणि सौम्य बक्षी यांना साक्षीदार म्हणून न्यायालयात सादर केले होते. या दोघांनी लिखित साक्ष ही नोंदवली आहे. न्यायमुर्तींनी याप्रकरणी शाह यांना समन्स बजावले असून २८ सप्टेंबरला न्यायालयात उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत.

भारतीय दंड संहिता १८६० कलम ५०० नुसार लावण्यात आलेल्या आरोपांवर उत्तर देण्यासाठी तुमची उपस्थिती आवश्यक आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. १३ ऑगस्ट रोजी शाह यांना कायदेशीर नोटीस पाठवून माफी मागण्यास सांगितले होते. शाह यांनी आपल्या भाषणात अभिषेक यांच्यावर खालच्या स्तराला जाऊन गंभीर आरोप केल्याचे नोटिशीत म्हटले होते.

अभिषेक हे कोणत्याही भ्रष्टाचारात सामील नसल्याचे दावा त्यांचे वकील संजय बसू यांनी केला आहे.