ब्लॅक मॅजिकच्या संशयातून एका व्यक्तिने शेजारी राहणाऱ्या महिलेची हत्या केली. छत्तीसगड रायपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली. पिंटू असे आरोपीचे नाव आहे. आपले लग्न होऊ नये म्हणून शेजारी राहणारी अमेरिका पटेल ही महिला ब्लॅक मॅजिक करते असा पिंटूला संशय होता. त्याच संशयातून त्याने अमेरिकाची हत्या केली. जवळपास १२ मुलींनी पिंटूला लग्नासाठी नकार दिला होता. काही प्रकरणात लग्नाची बोलणी व्हायची. पण पुढे कुठल्यातरी कारणावरुन लग्न मोडायचे.

आपले लग्न मोडण्यासाठी अमेरिका ब्लॅक मॅजिक करतेय असा पिंटूला संशय येत होता. पिंटू रायपूरच्या म्युरीथी गावामध्ये राहतो. सततच्या नकारामुळे हताश झालेल्या पिंटूने शेजारी राहणाऱ्या अमेरिका पटेलच्या हत्येचा कट रचला. रविवारी रात्री अमेरिका घरामध्ये एकटी होती. तिची आई भाजी विकण्यासाठी म्हणून गावाबाहेर गेली होती. तीच संधी साधून पिंटू अमेरिकेच्या घरात शिरला.

त्याने अमेरिकाच्या डोक्यात लाकडी बांबू मारला व त्यानंतर ओढणीने गळा आवळून तिची हत्या केली. गुन्हा करुन पिंटू पळत होता पण गावकऱ्यांनी त्याला पकडले व पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंटू बीएच्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.