अनैतिक संबंध कायम ठेवण्यास नकार दिला म्हणून माजी प्रियकराने प्रणयाच्या क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करुन तरुणीची बदनामी केली तसेच तिचे ठरलेले लग्नही मोडले. गुजरातच्या अहमदाबादमध्ये ही घटना घडली. पीडित तरुणीने आरोपी शांतीलाल परमार विरोधीत पोलिसात तक्रार दाखल केली आहे. नरोदा येथे रहाणाऱ्या २१ वर्षीय तरुणीची राजस्थान येथे लग्न सोहळयात आरोपी शांतीलाल परमार बरोबर ओळख झाली होती.

शांतीलालने या तरुणीचा इन्स्टाग्राम आयडी आणि मोबाइल क्रमांक मिळवला व चॅटिंग सुरु केले. हळूहळू रोजच्या चॅटिंगने प्रेमाचे वळण घेतले. वलसाड येथे रहाणार परमार एकदा अहमदाबाद येथे आला व हॉटेलमध्ये तरुणीला भेटला. खरंतर परमारचे लग्न झाले आहे. पण त्याने आपण अविवाहित आहोत असे सांगून तिला लग्नाची मागणी घातली. हॉटेलमध्ये त्यावेळी दोघांमध्ये शरीरसंबंध प्रस्थापित झाले. परमारने प्रणयाच्या त्या क्षणांचा व्हिडिओ बनवला असे नरोदा पोलिसांनी सांगितले.

जेव्हा ती परमारकडे लग्नाचा विषय काढायची तेव्हा तो नेहमीच लग्नाचा विषय टाळू लागला. त्यावेळी तरुणीच्या मनात संशय बळावला. तरुणीला वलसाड येथे रहाणाऱ्या तिच्या नातेवाईकांकडून परमारचे लग्न झाले असून त्याला एक मुलगा असल्याचे समजले. जेव्हा तिने याबद्दल परमारला जाब विचारला. तेव्हा त्याने तिला धमकावले.

जर तू संबंध कायम ठेवले नाहीस तर प्रणयाचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी दिली. व्हिडिओच्या भीतीपोटी तरुणी परमारला भेटत राहिली. त्यावेळी त्याने तिच्यावर जबरदस्ती केली. काही काळाने पीडित तरुणीचे एका मुलाबरोबर लग्न ठरले. जेव्हा परमारला याबद्दल समजले तेव्हा त्याने तो व्हि़डिओ सोशल मीडियावर पोस्ट केला तसेच्या तिच्या भावी नवऱ्यालाही पाठवला. त्यामुळे पीडित तरुणीचा साखरपुडा मोडला. त्यानंतर पीडित तरुणीने नरोदा पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदवली.