राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर २०११ साली हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ८ वर्षानंतर अटक केली आहे. अरविंद्र सिंग असे या व्यक्तीचे नाव असून त्याला पोलिसांनी दिल्लीमधून अटक केली आहे.

पवारांवर हल्ला केल्यानंतर अरविंदर मागील आठ वर्षांपासून फरार होता. दिल्ली न्यायालयाने २०१४ मध्ये त्याला गुन्हेगार घोषित केलं होतं. अरविंदरला आज पोलिसांनी दिल्लीमधून अटक केली. दिल्लीमध्ये ट्रान्सपोर्टर म्हणून काम करणाऱ्या अरविंदरने आपण महागाईमुळे आणि भ्रष्टाचाराने वैतागलो असून योग्य नियोजन करुन तत्कालीन कृषीमंत्री शरद पवार यांच्यावर हल्ला केल्याची कबुली दिली होती. पवारांच्या चेहऱ्यावर हाताने जोरदार फटका लगावल्यानंतर अरविंद्र त्याच्याकडील धारदार शस्त्राने हल्ला करण्याच्या इराद्यामध्ये होता. त्यासाठी त्याने हत्यारही उपसलं होतं. पण सुरक्षा रक्षकांनी वेळीच प्रसंगावधान दाखवत त्याला पवारांपासून दूर ढकललं.

या प्रकरणाला जास्त महत्व देण्याची गरज नाही असं पवारांनी या प्रकरणानंतर म्हटलं होतं. “सुरुवातीला पत्रकारांमध्येच धक्काबुक्की झाल्यासारखं मला वाटलं. आपण ठीक असून कोणताही गंभीर दुखापत आपल्याला झाली नाही” असं स्पष्टीकरण नंतर पवारांनी दिलं होतं. झटपट प्रसिद्धी मिळवण्यासाठी हा प्रकार घडवून आणल्याचा आरोप त्यावेळी भाजपच्या काही नेत्यांनी केला होता. तसेच या घटनेला जास्त महत्व देऊ नये असंही काही भाजपा नेत्यांनी म्हटलं होतं.